जम्मू : जम्मू काश्मिरातील उधमपूर व अशा अनेक अतिरेकी हल्ल्यांतील लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या भूमिकेबाबत पाकिस्तानी अतिरेकी मोहम्मद नावेद याकूब येत्या बुधवारी महा न्यायदंडाधिकारी न्यायालयासमक्ष कबुलीजबाब देणार आहे.नावेदने आपल्या सहकारी मोहम्मद नोमान ऊर्फ मोमिन याच्यासोबत मिळून गत ५ आॅगस्टला उधमपूर येथे भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते. याचवेळी भारतीय जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत मोमिन ठार झाला होता तर नावेदला दोन गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नावेदला सोमवारी कडक सुरक्षा बंदोबस्तात विशेष एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर त्याला मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. नावेद कबुली जबाब देऊ इच्छितो असे एनआयएने मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयास सांगितले. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावली. (वृत्तसंस्था)
नावेद बुधवारी कोर्टात देणार कबुली जबाब
By admin | Published: August 25, 2015 3:59 AM