नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी दिल्लीच्या न्यायालयाकडून लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी मोहम्मद नावेद याकूब याची लाय डिटेक्टर चाचणी घेण्याची परवानगी मिळविली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथे सीमा सुरक्षा दलाच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गावकऱ्यांनी नावेदला जिवंत पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते.एनआयएतर्फे २० वर्षांच्या नावेदला सोमवारी न्यायालयजात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने एनआयएला नावेदचे डीएनए आणि आवाजाचे नमुने घेण्याची परवानगी दिली. २४ आॅगस्टपर्यंत एनआयएच्या कस्टडीत असलेल्या नावेदची आज मंगळवारी सकाळी ११ वाजता सीजीओ संकुलातील केंद्रीय न्यायवैद्यक शास्त्र प्रयोगशाळेत लाय डिटेक्टर चाचणी घेण्यात येईल. न्यायालयात झालेल्या इन-कॅमेरा सुनावणीच्यावेळी जिल्हा न्यायाधीश अमरनाथ यांनी नावेदकडून होकार मिळाल्यानंतर त्याची पॉलिग्राफी चाचणी घेण्याची अनुमती एनआयएला दिली. ‘गुन्ह्णाचे गांभीर्य लक्षात घेऊन मी पॉलिग्राफी चाचणीसाठी आरोपीला १८ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नवी दिल्लीच्या लोधी मार्गावरील सीजीओ संकुलातील न्यायवैद्यक शास्त्र प्रयोगशाळेत घेऊन जाण्याची एनआयएला परवानगी देत आहे,’ असे न्या. अमरनाथ म्हणाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)
नावेदची आज लाय डिटेक्टर चाचणी
By admin | Published: August 17, 2015 11:40 PM