बहादूरगडः दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालया(JNU)चा माजी विद्यार्थी आणि नेते उमर खालिदबरोबर गेल्या वर्षी कथित मारहाण करणाऱ्या नवीन दलालला शिवसेनेनं तिकीट दिलं आहे. शिवसेनेनं दलालला हरियाणातील बहादूरगड मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे.दलाल म्हणाला, सहा महिन्यांपूर्वीच त्यानं शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. कारण भाजप आणि काँग्रेससारखे पक्ष गाय, शेतकरी, शहीद आणि गरिबांच्या नावे राजकारण करत आहेत. ते म्हणाले, मी शिवसेनेच्या नीती आणि अन्य मुद्द्यांवर घेतलेल्या स्पष्ट भूमिकेमुळे पक्षात सहभागी झालो आहे. 29 वर्षीय नवीन दलाल म्हणाला, गेल्या 10 वर्षांपासून मी गोरक्षेसारख्या मुद्द्यावर लढत आहे. मला असं वाटतं, भाजपा आणि काँग्रेससारखे पक्ष फक्त गाय आणि शेतकऱ्यांच्या नावे राजकारण करतात. मला माझ्या विधानसभा क्षेत्रात खूप समर्थन मिळत आहे. त्यांनी मला राजकारणात येण्यासाठी प्रेरित केलं. जेणेकरून मी त्यांचे प्रश्न उपस्थित करून त्यांना न्याय देऊ शकेन. भाजपाच्या नरेश कौशिक यांच्याशी मुकाबलाबहादूरगड विधानसभा जागेवरून दलाल यांचा थेट सामना सत्ताधारी भाजपाचे आमदार नरेश कौशिक, काँग्रेसचे राजेंद्र सिंह जून, आयएनएलडीचे नफेसिंह राठी आणि 20 अन्य उमेदवारांबरोबर आहे. दलालवर इतर लोकांना हाताशी धरून गेल्या वर्षी 13 ऑगस्टला दिल्लीतल्या कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये उमर खालिदवर हल्ला केल्याचा आरोप आहे. हरियाणात विधानसभेच्या 90 जागा असून, एका टप्प्यातच तिथे मतदान होणार आहे. 21 ऑक्टोबरला तिथे मतदान असून, 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
उमर खालिदवर हल्ला करणाऱ्या नवीन दलालला शिवसेनेचं तिकीट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 5:53 PM