ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाचा (बीजेडी) 'अस्त' आहे, विरोधी पक्ष काँग्रेस 'पस्त' आहे. तर जनता भाजपप्रति 'आश्वस्त' आहे. नवीन पटनायक यांच्या बीजेडी सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून आहे. पटनायक सरकारने सर्व आघाड्यांवर काम केले नाही. हे सरकार गेल्यानंतर, भाजपच्या नव्या सरकारचा 10 जूनला शपथविधी होईल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ओडिशातील आपल्या पहिल्याच निवडणूक प्रचार सभेदरम्यान, स्वत:ला भगवान जगन्नाथाचा पुत्र म्हणत केला.
बरहामपुर लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. येथील कनिनी भागात एका प्रचार सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, आपण 10 जूनला भुवनेश्वरमध्ये होणाऱ्या भाजपच्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधी समारंभासाठी ओडिशातील लोकांना आमंत्रित करण्यासाठी आलो आहेत. 4 जून ही (मतमोजणीचा दिवस) बीजद सरकारच्या अस्ताची तारिख आहे. 6 जूनरोजी भाजप ओडिशासाठी आपला मुख्यमंत्री ठरवेल आणि 10 जूनला भाजप नेता मुख्यमंत्री पदाची शपथ घेईल."
मोदी म्हणाले, "काँग्रेसने ओडिशावर झवळपास 50 वर्षांपर्यंत राज्य केले. तर बीजदने 25 वर्षे राज्य केले. मात्र, मुबलक पाणी, सुपीक जमीन, खनिजे आणि किनारपट्टी असूनही राज्याचा हवा तसा विकास झाला नाही." यावेळी, पंतप्रधान मोदींनी येथील जनतेला ओडिशाला देशातील क्रमांक एकचे राज्य बनवण्यासाठी संधी देण्याचा आग्रह देखील केला.
बीजद अध्यक्ष तथा मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, राज्याला ओडिया भाषा आणि संस्कृती समजणाऱ्या मुख्यमंत्र्याची आवश्यकता आहे. निवडणुकीनंतर भाजप येथे डबल इंजिन सरकार बनवणार. बीजद सरकारची एक्सपायरी डेट 4 जून, 2024 आहे. आम्ही ओडिशाला देशातील क्रमांक एकचे राज्य बनवणार."
महत्वाचे म्हणजे, संसदेमध्ये एखादे बिल पास करताना मोदी सरकारला जेव्हा-जेव्हा अडच आली, तेव्हा-तेव्हा बीजू जनता दलाच्या खासदारांनी एनडीएमध्ये नसतानाही मोदी सरकारला साथ दिली. अर्थात नवीन पटनायक पीएम मोदींसाठी संकटमोचकाची भूमिका पार पाडत राहिले आहेत.