ओडिशा: सलग पाचव्यांदा ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी नवीन पटनायक विराजमान झाले आहेत. भुवनेश्वरमधील एक्झिबिशन ग्राऊंडमध्ये नवीन पटनायक यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नवीन पटनायक यांच्यासह एकून 21 मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली आहे.
नवीन पटनायक यांच्यासह मंत्रीमंडळात एकूण 21 मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये 11 कॅबिनेट मंत्री आणि 9 राज्यमंत्री आहेत. यात 10 नवीन चेहरे आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटकरुन नवीन पटनायक यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
ओडिशात लोकसभा व विधानसभा निवडणुकांत आपला बालेकिल्ला शाबूत राखणारे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची बिजू जनता दलाच्या (बिजद) विधिमंडळ नेतेपदी गेल्या रविवारी एकमताने निवड करण्यात आली होती. त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी निमंत्रण दिले होते.
नवीन पटनायक हे पाचव्यांदा ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. 146 सदस्य असलेल्या ओडिशा विधानसभेच्या निवडणुकांत बिजदने 112 जागा जिंकल्या आहेत. तर राज्यातील 21 पैकी 12 लोकसभा जागांवर या पक्षाने विजय मिळविला आहे.
गेल्या रविवारी बिजद विधिमंडळ पक्षाच्या सुमारे पाऊण तास चाललेल्या बैठकीत नवीन पटनायक यांची नेतेपदी निवड करण्यात आली. त्यावेळी आमदारांसमोर बोलताना ते म्हणाले होते की, ओडिशाच्या विकासासाठी आता माझे सरकार आणखी जोमाने प्रयत्न करेल.
एनडीएला सहकार्य करणार का?फोनी चक्रीवादळाने तडाखा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाची हवाई पाहणी केली होती. त्यावेळी ओडिशाला मदत करणा-या कोणालाही आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत असे सूचक विधान मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केले होते. लोकसभा निवडणुकांत बहुमत मिळालेल्या एनडीएला पटनायक भविष्यात सहकार्याचा हात देतील का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.