नवी दिल्ली - करतारपूर कॉरिडोरच्या मुद्यावरुन अकाली दल आणि भाजपाकडून नवज्योतसिंग सिद्धू यांना टार्गेट केले जात आहे. नवज्योतसिंग सिद्धू वेडे झाले असून त्यांचा आयएसआय आणि पाकिस्तानसोबत घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप करत पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांनी जोरदार टीका केली होती. शिवाय, सिद्धूंच्या कॉलच्या तपशिलाचीही चौकशी करावी, अशी मागणीही सुखबीर सिंग बादल यांनी केली होती.
दरम्यान, यापूर्वी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनीही सिद्धूंवर निशाणा साधला होता. ''नवज्योतसिंग सिद्धू हे पाकिस्तानचे एजंट असून इमरान खान त्यांचा बोलक्या बाहुल्याप्रमाणे वापर करत आहेत'',अशी खोचक टीका केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी केली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धू यांनी उपस्थिती दर्शवल्याबाबत केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता.
सिद्धू यांच्या रुपात पाकिस्तानला नवीन एजंट मिळाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान त्यांचा बोलक्या बाहुल्याप्रमाणे वापर करुन घेत आहेत आणि सिद्धू त्यांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत, अशी बोचरी टीका हरसिमरत कौर बादल यांनी केली आहे. पाकिस्तानला जाऊन त्यांनी जनतेच्या भावना दुखावल्या. आता राहुल गांधी सिद्धूवर कारवाई करणार का?, असा प्रश्नही हरसिमरत कौर यांनी विचारला होता.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी करतारपूर मार्ग खुला करण्यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पहिले पाऊल उचलावे आणि पाकिस्तानशी चर्चा करावी, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर टीका केली.