मुंबई - लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या झालेल्या पराभवामुळे पंजाब विधानसभेतील काँग्रेसचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू सध्या टीकेचे धनी ठरले आहेत. निवडणुकीत त्यांच्याकडे महत्त्वाची भूमिका सोपविण्यात आली होती. परंतु, देशभरात काँग्रेसचा झालेला पराभव यामुळे सिद्धू सर्वांच्याच निशान्यावर आले आहेत. त्याचवेळी पंजाबमध्ये काँग्रेसच्या कामगिरीमुळे सिद्धू यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची प्रतिमा पक्षात आणखीनच उंचावली आहे.
काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे सिद्धू यांच्यावर टीका होत आहे. मात्र अशा परिस्थितीत देखील सिद्धू यांनी अल्लमा इक्बाल यांच्या कवितेच्या ओळी ट्विटरवर शेअर केल्या आहेत. 'सितारो से आगे जहा और भी है, अभी इश्क के इम्तिहां और भी है, तही जिंदगी से नही ये फजाए, यहां सेकडो कारवां और भी है, गए दिन की तन्हा था मैं अंजुमन में, यहां अब मिरे राज-दां और भी है.
या कवितेच्या माध्यमातून सिद्धू यांनी अमरिंदर सिंग यांच्यावर निशाना साधला असून स्वत:च्या स्थितीवर आपलं मत मांडले आहे. काँग्रेसच्या पराभवानंतर टीकेच्या केंद्रस्थानी आलेल्या सिद्धू यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. तर अमरिंदर सिंग देखील सिद्धू यांचं खात बदलण्यासाठी उत्सुक आहेत. तसेच निवडणूक काळात सिद्धू यांनी धर्मग्रंथाबद्दल केलेल्या वक्तव्यसंदर्भात पक्षाध्यक्षांकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले होते.
लोकसभा निवडणुकीच्या काळात, सिद्धू यांनी २०१५ मध्ये धर्मग्रथांच्या अपमानाबद्दल करण्यात आलेल्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर अमरिंदर सिंग यांनी दावा केला होता की, सिद्धू यांच्या वक्तव्यामुळे पक्षाला भटिंडा मतदार संघात नुकसान सहन करावे लागले.