चंडीगड: पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. मात्र, आताच्या घडीला पंजाब विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. एकूणच पंजाबमधील राजकीय परिस्थिती पाहता हे अधिवेशन चांगलेच गाजणार असल्याचे सांगितले जात आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी अकाली दलाचे विक्रम सिंग मजिठिया यांना उत्तर देताना भाजप माझ्यासाठी सावत्र आईसारखी होती. मात्र, आता मी कौसल्येकडे आलो आहे, असे म्हटले आहे.
पंजाब विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली. सभागृहात मोठा गदारोळ उडाला. अकाली दलाचे नेते आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात झटापटही झाल्याचे सांगितले जात आहे. यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी माध्यमांशी संवाद साधताना पंजाबमधील नागरिकांचे जीवन सुधारण्यासाठी तसेच कल्याणासाठी योजना, धोरणे यांच्या घोषणा केल्या जात आहेत. या केवळ दोन ते तीन महिन्यांसाठी नाही, तर पुढील ५ वर्षांच्या दृष्टिने आखल्या गेल्या आहेत, असे सूतोवाच नवज्योत सिंग सिद्धू यांनी केले.
भाजप माझ्यासाठी सावत्र आईसारखी होती
विधानसभा सभागृहात शीख दंगलीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाल्याचे मिळाले. अकाली दलाचे विक्रम सिंग मजिठिया यांनी, नवज्योत सिंग सिद्धू यांनी भाजप आपल्याला आईसारखी असल्याचे म्हटले होते, असे सांगत त्यांच्यावर निशाणा साधला. मजिठिया यांनी केलेल्या टीकेचा नवज्योत सिंग सिद्धू यांनी समाचार घेतला. भाजप माझ्यासाठी सावत्र आईसारखी होती, आता मी कौसल्येकडे (काँग्रेस) आलोय, असा पलटवार नवज्योत सिंग सिद्धू यांनी केला.
दरम्यान, विधानसभा अधिवेशनात वादग्रस्त कृषी कायद्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता. पंजाब सरकारने केंद्राच्या कृषी कायद्याची अंमलबजावणी करण्याचा कोणताही विचार केलेला नाही, असेही सिद्धू यांनी नमूद केले.