सुरेश भटेवरा,
नवी दिल्ली- माजी खासदार व क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी अखेर काँग्रेस पक्षात रविवारी प्रवेश केला. राहुल गांधींशी त्यांच्या निवासस्थानी चार दिवसांत त्यांची दोनदा भेट झाली. पक्षप्रवेशानंतर राहुल गांधींसह आपले छायाचित्र टिष्ट्वट करताना सिद्धूंनी लिहिले, ‘आता फ्रंट फूटवर एका नव्या इनिंगची सुरुवात... पंजाब, पंजाबियत व पंजाबी हमखास जिंकणार!’ सिद्धूंच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू मावळत्या विधानसभेत अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. सिद्धू तिथूनच निवडणूक लढतील, असे सांगण्यात येते. आधी अमृतसरमधून सिद्धू लोकसभेवर निवडून गेले होते, पण २0१४ साली अरुण जेटलींना उमेदवारी दिल्याने सिद्धू भाजपावर नाराज होते.>दो जिस्म, मगर एक जान है हमभाजपा सोडल्यानंतर ‘आप’मध्ये दाखल होतील, अशी चर्चा होती, पण सिद्धूंनी स्वत:ची संघटना स्थापन केली आणि आपशी बोलणी सुरू केली. त्यांच्यात तडजोड झाली नाही. दरम्यान, सिद्धूंच्या पत्नी नवज्योत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तेव्हा सिद्धूंचा प्रवेश कधी? असे विचारता, श्रीमती कौर यांनी, ‘दो जिस्म मगर एक जान है हम, एक दुसरे के बिना कब तक रह पायेंगे.’ त्यानुसार, रविवारी सिद्धू काँग्रेस पक्षात दाखल झाले आहेत.