Assembly Election Results: निवडणुकीत भाजपाचं गर्वहरण अन् सिद्धूंकडून पक्षाचं नामकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 11:45 AM2018-12-11T11:45:08+5:302018-12-11T11:46:07+5:30
नवज्योत सिंग सिद्धूंचा भाजपला टोला
अमृतसर: पाच राज्यांचे विधानसभा निवडणुकांचे निकाल हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहेत. यापैकी भाजपाच्या ताब्यातील तीन राज्यांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. यावरुन काँग्रेस नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनी भाजपाला टोला लगावला आहे. त्यांनी भाजपाचं नामकरणदेखील केलं आहे. भाजपा म्हणजे जीटीयू अर्थात गिरे तो भी टांग उपर आहे, असा चिमटा त्यांनी काढला आहे.
सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. 'राहुल भाई सुरुवातीपासूनच सर्वांना सोबत घेऊन पुढे जात आहेत. ते माणुसकीची मूर्ती आहेत. जो हात देशाचं नशीब घडवणार आहे, तो अतिशय मजबूत आहे,' अशा शब्दांमध्ये त्यांनी राहुल यांच्यांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. राहुल यांचं कौतुक करताना त्यांनी भाजपाला टोला लगावला आहे. भाजपा जीटीयू म्हणजेच गिरे तो भी टांग उपर आहे, असं सिद्धू म्हणाले.
Punjab Min Navjot Singh Sidhu on #AssemblyElections2018 results: Rahul bhai pehle se hi sabko saath leke chalte hain. Insaniyat ki moorat hain. Jo haath Bharat ki takdir ko apne haathon mein lene waale hain, wo bade majboot hain, aur BJP ka naya naam- GTU, "Gire to bhi Tang Upar" pic.twitter.com/R8Qfrwq5hd
— ANI (@ANI) December 11, 2018
छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. ही तिन्ही राज्यं भाजपाकडे आहेत. मात्र यातील छत्तीसगडमध्ये भाजपाचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे. तर मध्य प्रदेश आणि राजस्थानात काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. हिंदी भाषिक पट्ट्यातील ही राज्यं भाजपासाठी अतिशय महत्त्वाची आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गेल्या दीड दशकापासून भाजपा सत्तेत आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत या राज्यांमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे.