पाकिस्तानातील करतारपूर साहिब येथे दर्शनासाठी पोहोचलेले पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान खान पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. करतारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा यांना मिठी मारून विरोधकांच्या निशाण्यावर आलेल्या सिद्धू यांनी, आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठे भाऊ म्हणून संबोधले आहे. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने (भाजप) सिद्धूंना घेरले आहे.
करतारपूर येथे शनिवारी दर्शनासाठी पोहोचलेल्या सिद्धूंचे पाकिस्तानी शिष्टमंडळाने स्वागत केले. त्यांना पुष्पहार घालण्यात आला आणि त्यांच्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आला. सिद्धूचे स्वागत करताना करतारपूरचे सीईओ म्हणाले, “इमरान खान यांच्या वतीने मी तुमचे स्वागत करतो.” यावर सिद्धू म्हणाले, “इमरान खान माझा मोठा भाऊ आहे. त्याने मला खूप प्रेम दिले आहे."
भाजप आक्रमक -इम्रान यांना मोठा भाऊ म्हणून संबोधल्याने भाजपने सिद्धूंवर निशाणा साधला आहे. यावर भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, "आज सिद्धूंनी इम्रान खान यांना 'मोठा भाऊ' म्हणून संबोधले आणि म्हणाले, की मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो. कोट्यवधी भारतीयांसाठी ही चिंतेची बाब आहे. ही काँग्रेसची एक प्रकारची पद्धत आहे. सलमान खरशीद, मणिशंकर अय्यर, रशीद अल्वी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राहुल गांधी, हे सर्व हिंदू आणि हिंदुत्वाला शिव्या देतात. तर दुसरीकडे, सिद्धू पाकिस्तानच्या हिताची विधाने करत आहेत. हा योगायोग नाही.”
पात्रा म्हणाले, “काँग्रेसचे दिग्गज नेते आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू पाकिस्तानात गेल्यानंतर, इम्रान खान यांचे कौतुक आणि पाकिस्तानची स्तुती करणार नाहीत, असे होऊच शकत नाही.”