नवी दिल्ली - कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेस (Congress) अंतर्गत राजकारणात खळबळ उडाली. आता काँग्रेसने ज्याला हवे त्याला मुख्यमंत्री बनवावे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया अमरिंदर सिंग यांनी राजीनाम्यानंतर दिली. त्यानंतर आता अमरिंदर सिंग यांच्याविरोधात बंडखोरी करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद पटकाविणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धूंनी (Navjot Singh Sidhu) देखील राजीनामा दिला आहे. यानंतर आता सिद्धू यांनी "राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत कायम उभे राहणार मग कोणत्याही पदावर असो किंवा नसो" असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मी गांधीजी आणि शास्त्रीजींच्या तत्त्वांचे कायम पालन करेन. तसेच मी पक्षात कोणत्याही पदावर असो अथवा नसो, मी कायम राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत उभा राहीन. सर्व नकारात्मक शक्तींना मला पराभूत करण्याचा जेवढा प्रयत्न करायचा आहे, तेवढा करू द्या. परंतु सकारात्मक ऊर्जेच्या प्रत्येक छोट्या प्रयत्नाने पंजाब जिंकेल. पंजाबियत (युनिव्हर्सल ब्रदरहुड) जिंकेल आणि प्रत्येक पंजाबी जिंकेल!!" असं सिद्धू यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी पदाचा राजीनामा देत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये "तडजोडी करण्यापासून माणसाचे चारित्र्य ढासळण्यास सुरुवात होते. मी पंजाबचे भवितव्य व पंजाबच्या कल्याणासाठीच्या योजना यावर तडजोड करणार नाही. त्यामुळे मी पंजाबच्या प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे" असं म्हटलं आहे. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल (Sukhbir Singh Badal) यांनीही नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते एक 'मिसगायडेड मिसाईल' असल्याचं म्हणत बादल यांनी निशाणा साधला आहे. "सिद्धू हे दिशाहीन मिसाईल असून त्यांना कुठे जायचंय हेच माहीत नाही" असं म्हटलं आहे. बादल यांनी चंदीगडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना असं म्हटलं आहे.
"नवज्योत सिंग सिद्धू हे दिशाहीन मिसाईल, पंजाबला वाचवायचं असेल तर मुंबईला निघून जावं"
"मी आधीच सांगितले होते की नवज्योत सिंग सिद्धू हे एक दिशाहीन मिसाईल आहे, ज्याला माहीत नाही की ते कुठे जाईल किंवा कोणास मारेल. त्यांनी सर्वात आधी पंजाबकाँग्रेस अध्यक्ष बनून कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा नाश केला आणि आता त्यांच्या पक्षाचा नाश केला" असा शब्दांत बादल यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तसेच "सिद्धूंनी पंजाब वाचवण्यासाठी मुंबईला निघून जावं. मी आधीच सिद्धूबद्दल इशारा दिला होता, सिद्धू अहंकारी माणूस आहे, हे पंजाबमधील प्रत्येक मुलाला हे माहीत आहे. त्यामुळे जर सिद्धूंना पंजाबला वाचवायचं असेल तर त्यांनी मुंबईला निघून जावं, अशी मी त्यांना विनंती करतो" असा सणसणीत टोला देखील सुखबीर सिंग बादल यांनी लगावला आहे.