पतियाळा-
काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू १० महिन्यांच्या कालावधीनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. सुप्रीम कोर्टानं सिद्धू यांना गेल्या वर्षी १९ मे रोजी रोड रेज प्रकरणी वर्षभराची शिक्षा सुनावली होती. पण नवज्योत सिंग सिद्धू यांच्या चांगल्या वागणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना दोन महिन्याआधीच तुरुंगातून मुक्तता करण्यात आली.
तुरुंगातून बाहेर येताच नवज्योत सिंग सिद्धू यांनी जोरदार भाषण केलं. यात सिद्धू यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात सिद्धू यांचं काँग्रेस कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आलं. "लोकशाही नावाची कोणतीच गोष्ट या देशात शिल्लक राहिलेली नाही. पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. अल्पसंख्याकांना लक्ष्य केलं जात आहे. ज्या ज्या वेळी हुकूमशाहीचा उदय झाला आहे. तेव्हा क्रांती घडली आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधी हे एक क्रांती घडवण्याच्या उद्देशाच आपल्या सर्वांच्या समोर आले आहेत. सरकारला आता सत्य ऐकावंसं वाटत नाही. सरकारी संस्था सध्या केंद्राच्या गुलाम बनल्या आहेत. सरकारला सत्य ऐकू गेलं पाहिजे आणि यासाठी राहुल गांधीच क्रांती घडवू शकतात", असं नवज्योज सिंग सिद्धू म्हणाले.
सिद्धू यांना ३४ वर्षे जुन्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. अमृतसरचे काँग्रेस खासदार गुरजीत सिंह औजला हेही तुरुंगाबाहेर सिद्धू यांचं स्वागत करण्यासाठी पोहोचले होते. ते म्हणाले की पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग आणि इतर काँग्रेस नेते त्यांच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत, त्यामुळे ते येथे येऊ शकले नाहीत, परंतु काँग्रेस एकजूट आहे.