नवी दिल्लीः काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 2014मध्ये गंगा स्वच्छ करण्याचं आश्वासन देऊन मोदी सत्तेत आले, परंतु 2019ला राफेलमधील घोटाळ्यामुळे त्यांना सत्तेबाहेर जावं लागणार आहे. गंगा स्वच्छतेवरून सिद्धू यांनी मोदींवर प्रहार केला आहे. मोदींनी केलेला गंगा स्वच्छतेचा दावा फार खोटा ठरला आहे, गंगा आमची ओळख आहे. ओळखच हरवली तर कुठे जाणार, असा प्रश्नही सिद्धू यांनी उपस्थित केला आहे.डिजिटल इंडियाअंतर्गत ब्रॉड बँड कनेक्टिव्हिटी अडीच लाख गावांत जाणार होती, पण फक्त 1 लाख 10 हजार गावांपर्यंत फक्त केबल पोहोचली आहे, मोदींनी ग्रामपंचायतीपर्यंत इंटरनेट घेऊन जाणार असल्याची दिलेली मोठंमोठी आश्वासन फोल ठरली आहेत. मोदींनी अद्यापही जालियनवाला बाग स्मारक ट्रस्टची बैठक घेतली नाही. तसेच अमृतसरला भेट दिलेली नाही, असंही सिद्धू म्हणाले आहेत.मोदींकडे प्रचारासाठी आता कोणतेच विकासाचे मुद्दे नाहीत, म्हणूनच ते जनतेची दिशाभूल करत आहेत. 2014मध्ये मोदींनी सांगितलं, ना खाऊंगा, ना खाने दुंगा, परंतु सर्वच त्या उलट केलं. मोदींनी 2014मध्ये 300हून अधिक आश्वासनं दिली होती. ज्यात गंगा नदीची स्वच्छता, दरवर्षी दोन कोटी रोजगार उत्पन्न करणं, प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करणे यांसारख्या आश्वासनांचा समावेश होता. परंतु यातलं एकही आश्वासन सत्यात उतरलं नाही, अशी टीकाही सिद्धू यांनी मोदींवर केली आहे.
"मोदी गंगा स्वच्छतेच्या आश्वासनानं सत्तेत आले, राफेलनं पायउतार होतील"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 11:54 AM