चंडीगड : काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या (AAP) उमेदवारांवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) वगळता नामांकनासाठी दिलेली बाकीची नावे 'पंजाबसोबत विश्वासघात' आहेत, असे नवज्योतसिंग सिद्धू यांनी म्हटले आहे.
आम आदमी पक्षाने 31 मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक अशोक मित्तल, आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा, आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक संदीप पाठक आणि उद्योगपती संजीव अरोरा यांना उमेदवारी दिली आहे. या सर्व उमेदवारांनी सोमवारी पंजाब विधानसभा कॉम्प्लेक्समध्ये अर्ज दाखल केले आहेत.
राज्यसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या या उमेदवारांबाबत काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विट करत म्हटले आहे की, दिल्लीच्या रिमोट कंट्रोलसाठी नवीन बॅटऱ्या चमकत आहेत. फक्त हरभजन सिंग अपवाद आहे, बाकीच्या बॅटऱ्या पंजाबसोबत विश्वासघात आहेत.
राज्यसभा निवडणुकीसाठी 5 नवीन उमेदवारांबाबत काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाने आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस आमदार सुखपाल खैरा म्हणाले की, या नामांकनांमुळे निराशा झाली असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाच रबर स्टॅम्प असणार आहे. मुख्यमंत्री भगवंत मान पंजाबमधील काही प्रमुख व्यक्तींना राज्यसभेवर पाठवतील जेणेकरून ते पंजाबशी संबंधित विविध मुद्दे प्रभावीपणे मांडतील, अशी आशा होती, असे सुखपाल खैरा म्हणाले.
दरम्यान, सुखदेव सिंग धिंडसा, प्रताप सिंग बाजवा, श्वैत मलिक, नरेश गुजराल आणि शमशेर सिंग डुल्लो यांच्यासह पंजाबमधील पाच राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 19 एप्रिल रोजी संपणार आहे. त्यामुळे 31 मार्च रोजी पंजाबमधील राज्यसभेच्या 5 जागांसाठी निवडणूक होणार आहे.