चंदिगड - पंजाब सरकारमधील कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनीख्रिसमसला वाद निर्माण करणा-यांना उघडपणे धमकी दिली आहे. पंजाबमध्ये ख्रिश्चनांकडे डोळे वटारुन पाहणा-यांचे डोळे काढले जातील अशी धमकीच नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिली आहे. अमृतसरमध्ये राज्य सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या ख्रिसमसच्या एका कार्यक्रमात बोलताना नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले की, 'जर कोणी तुमच्याकडे डोळे मोठे करुन पाहत असेल, तर आम्ही त्याचे डोळे काढून घेऊ'.
गतवर्षी भाजपाची साथ सोडत काँग्रेसचा हात हातात घेणा-या नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबमध्ये कोणत्याही सणात बाधा आणण्याची परवानगी नाही असं म्हटलं आहे. 'सर्व धर्मातील लोकांना पंजाबमध्ये शांतता हवी असून, प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही धर्माचा प्रचार करण्याचा आणि त्याला मानण्याचा संपुर्ण अधिकार असल्याचंही', नवज्योत सिंग सिद्धू बोलले आहेत.
धार्मिक स्वातंत्र्य हा भारतीय राज्यघटनेचा भाग असल्याचं सिद्धू यांनी सांगितलं. 'माझ्या सरकारने प्रत्येक समाजाला आपले सण साजरे करण्यासाठी स्वतंत्र आणि योग्य वातावरण दिलं जाईल असं आश्वासन दिलं होतं', असं सिद्धू बोलले. यासोबतच सिद्धू यांनी सुवर्णमंदिराची दारं सर्वधर्मियांसाठी नेहमी खुली असल्याचंही त्यांनी सांगितलं. 'पंजाबमध्ये सर्व धर्मातील लोक सामंजस्याने राहतात. शांततापूर्ण परिस्थिती खराब होईल अशी वेळ येऊ देणार नाही असं आश्वासन आम्ही तुम्हाला देतो', असं सिद्धू यांनी यावेळी सांगितलं.
जालंधरमधील रोमन कॅथलिक चर्चचं नेतृत्व करणारे बिशप फ्रांको मुलाक्कलदेखील यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी ख्रिसमस साजरा करण्यावरुन होणा-या वादावर चिंता व्यक्त केली. 'देशातील अनेक भागात ख्रिसमस साजरा कऱण्याची परवानगी दिली जात नाहीये. हे आमच्या अधिकारांचं उल्लंघन आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला सण साजरा करण्याची परवानगी मिळालीच पाहिजे. काही लोकांसाठी ख्रिसमस एक वादाचा मुद्दा आहे याचं आश्चर्य वाटतं. पण पंजाबमध्ये ख्रिसमस साजरा करण्यासाठी स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद आहे. राज्यात कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात आहे', असं ते म्हणाले आहेत.