भारताचे माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू एका खटल्यात दोषी ठरल्याने सध्या तुरुंगवास भोगत आहेत. दरम्यान, तुरुंगात असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर मोठं संकट कोसळलं आहे. सिद्धू यांच्या पत्नीला स्टेज २ कर्करोगाचं निदान झालं आहे. पंजाबच्या माजी मंत्री असलेल्या नवज्योत कौर सिद्धू यांनी या आजाराचे निदान झाल्यानंतर ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
तसेच नवज्योत कौर सिद्धू यांनी पती नवज्योत सिंह सिद्धू यांना एक भावूक पत्र लिहून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. त्यांनी पत्रात लिहिले की, नवज्योत सिंग सिद्धू एका अशा गुन्ह्यासाठी तुरुंगात आहेत. जो त्यांनी केलेलाच नाही. माफ करा त्या सर्वांना जे या सर्वात सहभागी आहेत. तुरुंगाबाहेर प्रत्येक दिवशी तुमची वाट पाहणं मला तुमच्यापेक्षा अधिक दु:खदायी आहे. नेहमीप्रमाणे मी तुमच्या वेदना वाटून घेण्याचा प्रयत्न करते. मला माहिती आहे की, हे खूप वाईट आहे, मात्र त्यात काही सुधारणा होत आहे.
नवज्योत सिंग सिद्धू सध्या पंजाबमधील पतियाळा तुरुंगात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानंतर रोडरेज प्रकरणात ते एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. नवज्योत कौर यांनी आपल्या ट्विटमध्ये आपल्याला स्टेज-२ कॅन्सर असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यासाठी मी कुणालाही दोष देऊ शकत नाही. कारण ही देवाची मर्जी आहे, असे सांगितले.
नवज्योत सिंग सिद्धू यांना लिहिलेल्या पत्रात नवज्योत कौर लिहितात की, मी वारंवार न्यायासाठी विनंती केली. मात्र न्याय मिळाला नाही. मी तुमची वाट पाहत राहिले. सत्य शक्तिशाली असतेय मात्र ते प्रत्येकवेळी परीक्षा घेते. कलियुग आहे. माफ करा. तुमची वाट पाहू शकत नाही. कारण मला स्टेज-२ कॅन्सर आहे. आज सर्जरी होणार आहे. कुणालाही दोष देता येणार नाही. कारण ही देवाची मर्जी आहे.