चंदीगड: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात आंदोलन करणाऱ्या पंजाब काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना चंदीगडमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातही लखीमपूर खीरीमध्ये झालेल्या घटनेनंतर त्या ठिकाणी जाणाऱ्या अनेक विरोधी पक्षातील नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कोणालाही घटनास्थळी जाऊ दिलं नाही.
लखीमपूर खीरीमध्ये झालेल्या घटनेच्या विरोधात नवज्योत सिंग सिद्धूंच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्ते पंजाबच्या राज्यपालांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करत होते. यावेळी काँग्रेसकडून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात घोषणा दिल्या जात होत्या. यावेळी सिद्धू यांनी केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या मुलाच्या अटकेची मागणी केली. यादरम्यान, चंदीगड पोलिसांनी सिद्धू आणि इतर काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
लखीमपूरमध्ये नेमकं काय झालं?उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या दौऱ्यावर शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान रविवारी लखीमपूर खीरी जिल्ह्यातील तिकोनिया भागात झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह नऊ जण ठार झाले. ही घटना तिकोनिया-बनबीरपूर रस्त्यावर घडली. उपमुख्यमंत्र्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या दोन वाहनांनी आंदोलकांना कथितरीत्या धडक दिल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी दोन्ही वाहनांची जाळपोळ केली. या घटनेत चार शेतकरी आणि वाहनांवरील इतर चार लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि खेरीचे खासदार अजय कुमार मिश्रा यांचे मूळ गाव असलेल्या मण्य यांच्या बनबीरपूरच्या दौऱ्याला शेतकरी विरोध करत होते.