ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - माजी कसोटी क्रिकेटपटू व राज्यसभेतील राष्ट्रपतीनियुक्त सदस्य नवज्योत सिंग सिद्धू यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभेवर जाऊन अवघे अडीच महीनेही होत नाहीत तोच सिद्धूंनी पड सोडले असून भाजपालाही रामराम केला आहे.
पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांच्या पक्षातील एक्झिटमुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान भाजपामधून बाहेर पडल्यानंतर सिद्धू आम आदमी पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असून त्यांना आपतर्फे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हमून घोषित करण्यात येण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान सिद्धू यांच्या पत्नीनेही आमदारपदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान यापूर्वी सिद्धू यांनी पक्षावरील नाराजी व्यक्त केली होती. पक्ष माझ्याकडे दुर्लक्ष करीत असून देशातील तरुणांची सेवा करण्याची संधी पक्षनेतृत्वाने मला द्यावी, अशी भावना त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली होती. पक्षाला व देशाला द्यावे असे माझ्याकडे बरेच काही होते; परंतु पक्ष तशा स्वरूपाच्या जबाबदाऱ्या देत नसल्यामुळे मी बाजूला फेकलो गेलो आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली होती.
भाजपावर नाराज असलेले सिद्धू आपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र सिद्धूसांरखा वक्ता बाहेर पडू नये यासाठी भाजपावालेही कसून प्रयत्न करत होते. मात्र अखेर आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच सिद्धूनी त्यांचा राजीनामा उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याकडे सोपवला.
दरम्यान सिद्धू यांचे आमच्या पक्षात सदैवच स्वागतच असेल, मात्र त्यांनी अद्याप आमच्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही, असे सांगत 'आप'नेही त्यांच्या पक्षप्रवेशासाठीचे सर्व दरवाजे उघडे असल्याचे सूचित केले.