- बलवंत तक्षक चंदिगड : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीत पराभव झाल्यास आपण राजकीय संन्यास घेऊ, अशी घोषणा करणारे क्रिकेटपटू व पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू राजकीय संन्यास घेणार का? मंत्रीपदाचा खरोखर राजीनामा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खरे तर काँग्रेसमधील अनेक जणांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणीही सुरू केली आहे.स्मृती इराणी यांनी या वेळी राहुल गांधी यांना आपण पराभूत करू, असा दावा केला होता. त्यावर अमेठीतील सभेत नवज्योत सिंग सिद्धू यांनी राहुल गांधीच विजयी होतील आणि तसे न झाल्यास आपण राजकीय संन्यासच घेऊ , अशी घोषणा केली होती. ती घोषणाच त्यांना आता अडचणीची बनली आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग व नवज्योत सिंग सिद्धू यांचे अजिबात पटत नाही. त्यामुळे कदाचित तेच सिद्धू यांना दूर करतील, अशीही चर्चा सुरू झाली आहे.कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिद्धू यांना पंजाबमध्ये प्रचार करू नका, असे सांगितले होते. त्यावर पंजाबमध्ये काँग्रेसचा विजय झाल्यास त्याचे श्रेय कॅप्टनना मिळेल. पण काँग्रेस पराभूत झाल्यास अमरिंदर सिंग यांना त्याची जबाबदारी घ्यावी लागेल, असे विधान सिद्धू यांनी केले होते. तेव्हापासून दोघांमधील वाद अधिकच उफाळला. त्यात पंजाबमध्ये काँग्रेसला चांगले यशही मिळाले आहे.>मुख्यमंत्र्यांवरही टीका : भटिंडा येथे काँग्रेसच्या प्रचारासाठी गेलेल्या सिद्धू यांनी प्रकाशसिंग बादल कुटुंब व मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात मैत्रीपूर्ण सामना सुरू असल्याचे वक्तव्य केले होते. बादल यांच्यावर कारवाई करण्यास मुख्यमंत्री टाळाटाळ करीत आहेत. त्यांनी कारवाई न केल्यास आपण राजीनामा देऊ , असा इशाराही सिद्धू यांनी दिला होता. त्यामुळे सिद्धू यांच्या राजीनाम्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. काही जण तर सिद्ध यांनी आता राजकीय संन्यासच घ्यावा, असा सल्ला देताना दिसत आहेत.
नवज्योत सिद्धू देणार राजीनामा?; राजकीय संन्यास घेणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 4:31 AM