नवज्योत सिंग सिद्धू यांचा पुन्हा मुख्यमंत्र्यांविरुद्ध 'एल्गार'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 05:06 PM2019-06-06T17:06:29+5:302019-06-06T17:26:38+5:30
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत असलेले सिद्धू म्हणाले की, काँग्रेसच्या खराब कामगिरीसाठी मला जबाबदार धरण्यात येत आहे. हे चुकीचं आहे. पराभवाची जबाबदारी सामूहिक आहे.
नवी दिल्ली - पंजाब काँग्रेसमधील दोन प्रमुख चेहरे असलेले मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वाद थांबण्याचं नाव घेत नाही. उभय नेत्यांमध्ये झालेल्या वादानांतर सिद्धू यांनी उघड-उघड मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याविरुद्ध दंड थोपटल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या कॅबिनेट बैठकीला सिद्धू यांनी दांडी मारली. तसेच मुख्यमंत्र्यांना टोला देखील लगावला.
लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आपल्या नेतृत्वात प्रथमच कॅबिनेटची बैठक बोलविली होती. या बैठकीला काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कॅबिनेटमंत्री नवज्योत सिंग सिद्धू गैरहजर होते. गैरहजर असलेल्या सिद्धू यांनी पुन्हा अमरिंदर सिंग यांना लक्ष्य केले. पंजाबमधील काँग्रेसच्या खराब कामगिरीसाठी विनाकारण आपल्याला जबाबदार धरण्यात येत आहे. काही लोक आपल्याला पक्षातून काढून टाकण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा टोला सिद्धू यांनी अमरिंदर सिंग यांच नाव न घेता लगावला.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत असलेले सिद्धू म्हणाले की, काँग्रेसच्या खराब कामगिरीसाठी मला जबाबदार धरण्यात येत आहे. हे चुकीचं आहे. पराभवाची जबाबदारी सामूहिक आहे. केवळ माझ्याविरुद्धच कारवाई का, मी सतत चांगली कामगिरी करत असून खराब कामगिरी करणाऱ्या नेत्यांवर का कारवाई होत नाही, असा सवालही सिद्धू यांनी उपस्थित केला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅबिनेट बैठकीत पंजाबमधील काही मंत्र्यांचे विभाग बदलून तर काहींना मंत्रीमंडळातून डच्चू देण्यासंदर्भात चर्चा होणार होती. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आधीच म्हटले होते की, शहरी भागात पक्षाची कामगिरी पाहता, सिद्धूकडून त्यांचे मंत्रीपद काढून घेण्याची आवश्यकता आहे. त्यातच कॅबिनेट बैठकीला दांडी मारत सिद्धू यांनी उघड-उघड अमरिंदर सिंग यांच्याविरुद्ध दंड थोपटल्याचे चर्चा सध्या पंजाब काँग्रेसमध्ये सुरू आहे.