नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या कॅबिनेटमध्ये? ऊर्जामंत्री होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 01:23 PM2020-07-04T13:23:08+5:302020-07-04T13:30:03+5:30
नवज्योतसिंग सिद्धू यांना ऊर्जामंत्री पद देऊन पंजाब सरकारमध्ये परत आणण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लुधियाना : गेल्या काही महिन्यांपासून नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबच्या राजकारणात मौन बाळगले असले तरी त्यांच्या राजकीय भवितव्याविषयी अजूनही शक्यता आहे. पंजाबच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे की, २०२२ मध्ये पंजाब विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी काँग्रेसलानवज्योतसिंग सिद्धू यांच्याबरोबरचे सर्व वाद मिटवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळेच गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात नवज्योतसिंग सिद्धू यांच्याबद्दल अनेक बातम्या येत आहेत.
नवज्योतसिंग सिद्धू यांना ऊर्जामंत्री पद देऊन पंजाब सरकारमध्ये परत आणण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, विशेष म्हणजे नवज्योतसिंग सिद्धू यांनी यापूर्वी ऊर्जामंत्री पदाला नकार दिला होता. तसेच, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्याकडून स्थानिक संस्था विभागाचा पदभार काढून घेतल्यामुळे त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. अशा परिस्थितीत नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा एकदा पंजाब सरकारमध्ये ऊर्जामंत्री होण्यास तयार होतील की नाही, याविषयी तर्कवितर्क बांधले जात आहेत.
गेल्या बऱ्याच दिवसांपासून सक्रीय राजकारणापासून दूर असलेले नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा एकदा कॅप्टन सरकारमध्ये येण्याची शक्यता आहे. पंजाबच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल सुरू असल्याची चर्चा आहे. २८ जून रोजी इंडियन ओव्हरसीज आयोजित 'स्पीक अप इंडिया' या कार्यक्रमात नवज्योतसिंग सिद्धू यांचा सहभाग आणि त्यांनी केलेल्या भाषणानंतर ते पुन्हा एकदा मुख्य प्रवाहातील राजकारणात परतणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
दरम्यान, याप्रकरणी पंजाब सरकारशी संबंधित आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे निकटचे मानले जाणारे पंजाब सरकारचे प्रवक्ते राजकुमार वेरका नपी-तुली यांनी सांगितले की, "या सर्व चर्चा म्हणजे माध्यमांचा अंदाज आहे. नवज्योतसिंग सिद्धू मंत्रिमंडळात परत येतील अन्यथा पंजाब काँग्रेसमध्ये त्यांची जबाबदारी काय असेल, हे सर्व दिल्लीतील पार्टी उच्च कमांड ठरवेल." याशिवाय, नवज्योतसिंग सिद्धू पंजाब मंत्रिमंडळात परत येत आहेत, असे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी कधी म्हटले नाही किंवा नवज्योतसिंग सिद्धू यांनीही याबाबत काही म्हटले नाही, असे राजकुमार वेरका नपी-तुली यांनी सांगितले.
याचबरोबर, यावर भाष्य करताना अकाली दलाचे प्रवक्ते दलजितसिंग चीमा म्हणाले की, "नवज्योतसिंग सिद्धू यांच्याबद्दल काँग्रेसमध्ये काय सुरू आहे, ते काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे आणि कधीकधी अशी चर्चा आहे की नवज्योतसिंग सिद्धू आम आदमी पार्टीत प्रवेश करणार आहेत. ते काँग्रेस सोडत आहेत हे माहीत आहे. मात्र, या चर्चेचा पंजाब किंवा पंजाबमधील लोकांना फायदा होणार नाही आणि या चर्चेचा काही उपयोग नाही. नवज्योतसिंग सिद्धू यांना काय करायचे ते करू शकतात."
गेल्या सोमवारी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळातील फेरबदलाची बातमी फेटाळली होती. यावेळी ते म्हणाले होते की, माध्यमांद्वारे पंजाब मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची बातमी मला समजते आहे. मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडे याबाबत काही माहिती नाही, असे कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सांगितले होते.