चंदिगड - हरियाणा सरकारमधील भाजपाचे मंत्री अनिल विज यांनी नवज्योत सिंग सिद्धूवर प्रहार करताना सर्वात जास्त अपमानित झालेले नेते म्हणून हिणवलं आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेस-भाजपा पार्टीत स्वत:चा अपमान करुन घेतलेला आहे. त्यामुळे आता त्यांना फक्त एकच पर्याय आहे तो पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा पक्ष तहरीक-ए-इंसाफ या पक्षात सहभागी होणं. नवज्योत सिंग सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या वादावरुन अनिल विज यांनी नवज्योत सिंग सिद्धूंवर निशाणा साधला आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात मोर्चा उघडलेला आहे. भटिंडा लोकसभा निवडणुकीला घेऊन नवज्योत सिंग सिद्धू यांनी बादल परिवार फ्रेंडली मॅच खेळत असल्याचा आरोप मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर केला आहे. तसेच काँग्रेसच्या पाठित खंजीर खुपसणाऱ्यांना मतांची ताकद दाखवा असं आव्हान दिलं आहे.
सिद्धू यांनी काँग्रेसच्या मानप्रतिष्ठेचा मुद्दा थेट राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सन्मानाशी जोडला आहे. अद्याप यावर प्रदेश काँग्रेस कमिटीने कोणतंही भाष्य केलं नाही. नवज्योत सिंग सिद्धू यांनी मागील दिड दशकात अनेकदा राजकीय महत्त्वकांक्षेपोटी पार्टी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करताना पाहायला मिळाले आहेत.
दरम्यान सिद्धू विरोधात कारवाई करावी की नाही, हे पार्टीच्या हायकमांडनं ठरवावं. परंतु काँग्रेसनं शिस्त भंग केल्याचं सहन करू नये. माझी त्यांच्याविरोधात खासगी तक्रार नाही, मी त्यांना लहानपणापासून ओळखतो. ते महत्त्वाकांक्षी आहेत आणि मुख्यमंत्री बनू इच्छितात. तर गेल्या काही दिवसांपूर्वी अमरिंदर सिंग यांनी म्हटलं होतं की, जर राज्यात काँग्रेस निवडणूक हारली तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन. इतकंच नव्हे, तर त्यांनी सर्वच आमदार आणि मंत्र्यांना काँग्रेसच्या कामगिरीची जबाबदारी सोपवल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. तत्पूर्वी 14 मे रोजी नवज्योत सिंह सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी आरोप केला होता की, अमरिंदर सिंग यांच्यामुळेच पंजाबच्या प्रभारी आशा कुमारी यांना अमृतसर मतदारसंघातून तिकीट मिळालं नाही. परंतु अमरिंदर सिंग यांनी त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावत याच्याशी माझा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं.