Navjyotsing Sidhu : सिद्धूंची मनधरणी झाली, प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावरुन यु टर्न ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 09:48 PM2021-10-06T21:48:16+5:302021-10-06T21:49:45+5:30
Navjyotsing Sidhu : मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी कार्यकारी डीजीपी इक्बाल प्रीत सहोता आणि अॅड. जनरल एपीएस देओल यांना नियुक्त करण्याच्या विरोधात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.
नवी दिल्ली - पंजाबकाँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय भूकंप पाहायला मिळत आहे. पंजाबकाँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ पंजाबच्या मंत्री रझिया सुल्ताना यांनीही राजीनामा दिला होता. त्यामुळे, पंजाबच्या राजकारणाची देशभर चर्चा होती. दुसरीकडे कॅप्टन अरमिंदर सिंग यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. आता, नवज्योतसिंग सिद्धूंचेही राजीनामा नाट्य संपुष्टात आलं आहे.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, आता सिद्धूंची मनधरणी करण्यात आली असून तेच पंजाबमधील काँग्रेसचे हायकमान असणार आहेत. सिद्धू यांनी अद्याप राजीनामा वापस घेतला नाही, पण तेच राज्याचा कारभार पाहणार आहेत. सिद्धू यांचे निकटवर्तीय आणि कॅबिनेटमंत्री परगटसिंह व पक्षाचे निरीक्षक हरीश चौधरी यांनी त्यांची समजूत काढली आहे. लवकरच सिद्धूंच्या नेतृत्वात काँग्रेसचे शिष्टमंडळ लखीमपूर खेरी येथे भेट देणार आहे.
मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी कार्यकारी डीजीपी इक्बाल प्रीत सहोता आणि अॅड. जनरल एपीएस देओल यांना नियुक्त करण्याच्या विरोधात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे, पंजाब काँग्रेसमध्ये आणि राजकारणात खळबळ उडाली होती. सिद्धू यांनी यावर्षी जुलैमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारले होते. त्यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का असल्याचे म्हटले जात. मात्र, सिद्धू यांनी आता आपलं राजीनामास्त्र गुंडाळल्याचं सांगण्यात येत आहे. सोनिया गांधींसोबत चर्चा झाल्यानंतर ते शांत झाल्याचे समजते.