नवी दिल्ली - आज सकाळी प्राणज्योत मालवलेल्या हिंगणघाट जळीत प्रकरणातील प्राध्यापिकेवर संध्याकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिच्या गावातील ग्रामस्थांसह हजारो नागरिकांनी तिला अत्यंत दु:खद अंतकरणाने निरोप दिला. हिंगणघाट येथील निर्भयाच्या निधनाच्या बातमीने महाराष्ट्र हादरला आहे. त्यानंतर, राज्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांनीही आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या आहेत.
हिंगणघाट प्रकरणातील पीडिता गेल्या 7 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होती. तिला सात फेब्रुवारीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तिच्या त्वचेला गंभीर इजा झाल्यानं जंतूसंसर्ग वाढत गेला आणि आज सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिनं अखेरचा श्वास घेतला होता. त्यानंतर, राज्यातील सर्वच नेत्यांनी तीव्र भावना व्यक्त करत आरोपींनी कडक शिक्षा आणि मृत्यूदंड देण्याची मागणी केली आहे. खासदार नवनीत राणा कौर यांनीही संताप व्यक्त केला आहे. मात्र, संताप व्यक्त करताना, पीडितेच्या वेदना आपल्याला सहन झाल्या नसून तिने जगूनही काहीच फायदा झाला नसता, असे कौर यांनी म्हटलंय.
“मला वाटते तिचा जगूनही काही फायदा झाला नसता आणि ती दरदिवशी मेली असती, कारण तिचे डोळे गेले होते, स्वरयंत्र जळालं होत. ती अर्धी जळाली होती. तिच्या डोक्याचा आणि चेहऱ्याचा भाग जळाला होता. ज्या दिवशी ही घटना घडली होती. त्या दिवसापासून मी देवाला रोज प्रार्थना करत होते, ती जिवंत नको राहायला कारण ती दर दिवसाला, दर तासाला, दर मिनिटाला मरत होती, त्यापेक्षा एकदाचं ती शांत झाली हे बरंच झालं”, असे नवनीत राणा कौर यांनी म्हटलंय.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल. तसेच पीडितेच्या भावाला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात येईल, असे वर्ध्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे व उपविभागीय महसूल अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी लेखी लिहून दिले आहे. गेल्या सोमवारी वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये एका शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. नंदोरी मार्गावरील महालक्ष्मी किराणा दुकानासमोर हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणातील आरोपीला नागपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.