नवी दिल्ली - अमरावतीच्या खासदार आणि मातोश्रीबाहेर आंदोलन करत हनुमान चालिसा पठण करण्याचा हट्ट धरलेल्या नवनीत राणा ह्या तुरुंगातून बाहेर आल्यापासून चर्चेत आहेत. तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी लिलावती रुग्णालयात उपचार घेतले. या रुग्णालयातील त्यांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर, थेट दिल्ली गाठत राणा दाम्पत्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. तर, आज केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी राणा दाम्पत्यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली.
लिलावती रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर, सोमवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. त्यावेळी, अटकेपासून लॉकअपपर्यंत आणि सुटकेपासून रुग्णालायतून घरी पोहोचेपर्यंत घडलेल्या प्रसंगाची इतंभू माहिती आपण लोकसभा अध्यक्षांना दिल्याचे नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. माझ्या तक्रारीची दखल घेत माझी संपूर्ण बाजू मांडण्यासाठी मला 23 तारीख देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. राणा यांच्या पुढील भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
१८ दिवसानंतर आई-वडिलांची भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर हनुमान चालिसा पठणावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना १४ दिवस कारागृहात राहावे लागले. या काळात त्यांची मुले ही अमरावती येथील ’गंगा-सावित्री’निवावस्थानीच होते. अखेर मुलगी आरोही आणि मुलगा रणवीर हे मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास विमानाने दिल्लीकडे रवाना झाले. तब्बल १८ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दोन्ही मुलांनी दिल्लीत जाऊन आई-वडिलांची भेट घेतली.