नवी दिल्ली - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संसदेत अविश्वास प्रस्तावातील चर्चेत सहभाग घेतला. यावेळी, मणिपूर हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचारावर भाष्य करताना त्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं. विरोधी पक्षाकडून केवळ राजकारणासाठी मणिपूरच्या घटनेचा वापर केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी, हनुमान चालिसा पठणवरुन त्यांना झालेल्या अटकेचा उल्लेख करत त्यांनी विरोधकांना सवाल केला. हनुमान चालिसा म्हणतेय म्हणून एका महिलेला १४ दिवस तुरुंगात टाकलं जातं, तेव्हा कुठे होते विरोधक असे म्हणत राणा यांनी आक्रमपणे आपली भूमिका मांडली. तसेच, मणिपूर व्हायरल व्हिडिओवरुनही चौकशीची मागणी केली आहे.
मणिपूर हिंसा, मणिपूर महिलांवरील अत्याचार हा विरोधकांचा विषय नाही. तर, मोदींचं नाव आलं की विरोध करायचा, हाच त्यांचा अजेंडा आहे, असे म्हणत खासदार नवनीत राणा यांनी विरोधकांच्या टीकेनंतर अविश्वास प्रस्तावावर भाष्य केलं. यावेळी, मणिपूर हिसांचारानंतर महिलेची नग्न धिंड काढणारा व्हिडिओ ज्यांनी हेतुपूर्वकपणे व्हायरल केला त्याची चौकशी व्हावी आणि संबंधितांना शिक्षा करावी, अशी मागणीही राणा यांनी केली.
महिलांचा वापर हा राजकीय पोळ्या भाजण्यासाठी करता कामा नये. मणिपूरमधील घटनेचा सर्वांनीच निषेध केला. संसदेतील सर्वच सदस्यांनीही याचा निषेध केला. पण, ४ तारखेला घडलेल्या घटनेचा व्हिडिओ जुलै महिन्यात संसदेतील पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर जाणीवपूर्वक व्हायरल केला जातो. हेतुपूर्ण रितीने हा व्हिडिओ व्हायरल केला जातो. त्यानंतर पत्रकार आम्हाला प्रश्न विचारतात. व्हिडिओवर मत मांडायला लावतात. म्हणूनच, ज्यांनी हा व्हिडिओ हेतुपूर्वक व्हायरल केला आहे, त्यांची चौकशी व्हावी अशी मागणीच नवनीत राणा यांनी संसदेत केली आहे. महिलांची बदनामी करणाऱ्यांना, महिलांवरील अत्याचार सोशल मीडियातून समाजात आणणाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी, असेही राणा यांनी संसदेत बोलताना म्हटले.
खासदार राणा यांनी यावेळी राजस्थानमधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा उल्लेख केला. राजस्थानमधील घटनेवर विरोधक का शांत बसले आहेत, त्यांनी राजस्थानमधील बलात्कार आणि हत्याप्रश्न सभागृहात प्रश्न का उपस्थित केले नाहीत. मणिपूरमधील घटनेनंतर ४ मे रोजीच तुमचं डेलिगेशन तिथं का गेलं नाही, ३ महिन्यानंतर, संसदेच्या अधिवेशनावेळीच हे डेलिगेशन का गेलं नाही. केवळ फोटो काढण्यासाठी, दिखावा करण्यासाठी आणि सरकारला विरोध करण्यासाठीच तुम्ही तिथं गेल्याचं खासदार राणा यांनी म्हटलं आहे.