विशाखापट्टणम - देशभरात नवरात्रोत्सव भक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्रीच्या निमित्तानं आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील एका देवीचे मंदिर अनोख्या पद्धतीनं सजवण्यात आले आहे. या मंदिरातील सजावटीसंदर्भात संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. तब्बल 4 कोटी रुपये रोकड आणि 4 किलोग्रॅम सोन्याने या मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणममधील वासवी कन्यका परमेश्वरी मंदिरात करण्यात आलेली सजावट सध्या आकर्षणाचा आणि सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. मंदिरातील देवीच्या प्रतिमेला विविध आभूषणांनी सजवण्यात आले आहे. यामध्ये 4 किलोग्रॅम सोन्याचा समावेश आहे. तर दुसरीकडे देवीच्या प्रतिमेच्या मागे आणि मंदिरात 4 कोटी रुपयांच्या रोखरक्कमेनंही सजावट करण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या नोटांचा समावेश आहे.
असे म्हटले जाते की, येथे प्रत्येक वर्ष नवरात्रोत्सवात देवीच्या प्रतिमेचा विशेष असा श्रृंगार केला जातो. देवीचे हे मंदिर जवळपास 130 वर्ष जुने आहे. दरम्यान, यंदा मंदिरात करण्यात आलेल्या सजावटीची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.