वडोदरा: सध्या नवरात्रोत्सव देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. देशभरातील मंदिरे आणि बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गुजरातमध्येनवरात्रीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. येथे लोक नवरात्रीत दांडिया आणि गरबा खेळतात. तुम्ही महिलांना दांडिया-गरबा खेळताना पाहिले असेल. पण, गुजरातमध्ये एक अशी जागा आहे, जिथे फक्त पुरुषच गरबा खेळतात. या ठिकाणी पुरुष लेहंगा-साडी घालून गरबा खेळतात. ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल, पण हे खरं आहे.
पुरुष गरबा खेळतात अन् महिला...गुजरातच्या वडोदरा येथे असलेल्या अंबा माता मंदिरात नवरात्रीला खूप मोठे महत्व आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात येथे खूप उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. येथे तुम्हाला नवरात्रीची वेगळी धमाल अनुभवता येईल. मंदिरात पुरुषांनी गरबा खेळण्याची फार जुनी परंपरा आहे. विशेष म्हणजे येथे पुरुष साडी आणि लेहंगा घालून गरबा खेळतात. तर, महिला खिडकीत बसून गाणी म्हणतात. हे दृश्य पाहण्यासाठी लोक लांबून मंदिरात येतात. पण, आज सर्वच पुरुष साडी घालतात असेल नाही, काहीजण साडी घालतात तर काही पुरुषांच्या कपड्यातच गरबा खेळतात.
400 वर्षांपूर्वीची परंपरा तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, गेल्या 400 वर्षांपासून या ठिकाणी फक्त पुरुषच गरबा खेळत आहेत. कथेनुसार, गायकवाडांच्या आधी वडोदरावर इस्लामिक शासकांचे राज्य होते. तेव्हा स्त्रियांना बाहेर फिरण्याची परवानगी नव्हती. मातृदेवतेची पूजा करण्यासाठी येथे फक्त पुरुषच महिलांचा वेश धारण करून गरबा खेळायचे. आजही ही परंपरा कायम आहे आणि अंबा माता मंदिराच्या गरब्यात फक्त पुरुष गरबा खेळताना दिसतात.
हे आहे कारण ?इस्लामिक शासकांच्या महिलांसाठी रात्री उशिरा गरब्यात सहभागी होणे सुरक्षित मानले जात नव्हते. यामुळे पुरुष महिलांच्या वेशात गरबा खेळू लागले. महिलांना मंदिरात येण्यास बंदी नाही, परंतु ही जुनी परंपरा कायम ठेवण्यासाठी त्या आजही गरबा करण्याऐवजी गाणी गातात आणि पुरुष गरबा खेळतात. अंबाजी माता मंदिर हे प्राचीन आणि प्रमुख धार्मिक स्थळांमध्ये ओळखले जाते. हे मंदिर माँ दुर्गेच्या 51 शक्तीपीठांपैकी एक आहे.