रांची - सर्वसाधारणपणे कुठल्याही मंदिरात जाणाऱ्या भक्तगणांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय असते. मात्र आज आम्ही एका अशा मंदिराबाबत माहिती देणार आहोत जिथे महिलांचा प्रवेश निशिद्ध आहे. हे मंदिर झारखंडमधील बोकारो येथील आहे. एकीकडे देशात शारदीय नवरात्रौत्सव उत्साहात साजरा होत असताना या मंदिरातील महिलांसाठीची प्रवेश बंदी ही अध्यात्माला आव्हान देणारं एक कोडं बनलेली आहे.
हे मंदिर बोकारो येथील मुख्यालयापासून सुमारे ४० किमी दूर कसमार येथील कुसमाटाड गावामध्ये आहे. या मंदिरामध्ये महिला भक्तांनी केलेला नवस पूर्ण होतो अशी श्रद्धा आहे. मात्र महिलांना मंदिरात प्रवेश करून पूजा करण्याची इच्छा असते. मात्र ती पूर्ण होत नाही. येथे महिलांना प्रवेश नसण्यामागे काही आख्यायिका सांगितल्या जातात. त्यानुसार ज्या मंदिरामध्ये महिलांनी प्रवेश केला होता. तिथे आता पूजा होत नाही. देवीने तेथील पुजाऱ्याच्या स्वप्नात येऊन आपली जागा बदलण्यास आणि महिलांना प्रवेश न करण्यास सांगितले होते. तेव्हापासून शेजारीच दुसरं मंदिर बांधण्यात आलं. तिथे पूजाआर्चा सुरू झाली. देवीला शेंदूर खूप आवडत असल्याने देवीची मूर्ती ही कायम शेंदूराने आच्छादलेली असते.
या मंदिरामध्ये महिला १०० फूट दूर अंतरावरून मंगलचंडी देवीची पूजा करतात. एवढ्याच अंतरावरून अगरपत्ती पेटवण्यासाठीही हद्द निश्चित करण्यात आली आहे. त्यापुढे येण्या महिलांना मनाई आहे. मात्र यामागे महिलांना दुय्यम, अपवित्र मानण्याचा किंवा पुरुषी वर्चस्वाचा मुद्दा नाही आहे. तर यामागे अंधश्रद्धेची १०० वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. त्यामुळे येथील मंदिरात महिला दूरवरूनच पूजा करतात.
असं सांगितलं जातं की, येथे जेव्हा एखादी महिला येऊन पूजा करते तेव्हा तिच्यासोबत काहीतरी अघटित घडते. एका महिलेने मंदिरात येऊन बळी दिलेल्या बकऱ्याचा प्रसाद खाल्ला तेव्हा ती वेडी झाली, असा दावा पुजाऱ्याने केला. त्यानंतर देवीने पूजाऱ्याच्या स्वप्नात येऊन आपलं स्थान बदलण्यास सांगितलं होतं.