कोची - गोल्डन ग्लोब रेस-२०१८ या आंतरराष्ट्रीय नौकानयन स्पर्धेदरम्यान जखमी झालेले भारतीय नौदलाचे कमांडर अभिलाष टॉमी यांचा नौकेसह शोध घेण्यात भारतीय सेनेच्या विमानाला यश आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने रविवारी दिली.गोल्डन ग्लोब रेसमध्ये सहभागी झालेले टॉमी हे जखमीदेखील झाले होते.कमांडर टॉमी यांच्या सुटकेसाठी हिंदी महासागरात तैनात असलेली भारतीय नौदलाची आयएनएस सातपुडा ही स्टेल्थ युद्धनौका घटनास्थळाकडे वळवण्यात आली. १४ मीटर उंच लहरींमध्ये वादळामुळे त्यांचू नौका अडकली होती. दरम्यान, शुक्रवारी त्यांच्या पाठीला जखमही झाली.त्यांच्या बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे याआधी नौदलाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले होते. दक्षिण हिंदी महासागरात वादळ आणि खवळलेल्या समुद्रामुळे त्यांच्या थुरिया या स्वदेशी बनावटीच्या नौकेचे नुकसान झाले असून, टॉमी जखमी झाले आहेत.टॉमी यांच्या बचावासाठी भारतीय नौदल, आॅस्ट्रेलियाची संरक्षण दले तसेच अन्य संस्था प्रयत्न करत आहेत. बचावकार्याचे नियोजन आॅस्ट्रेलियातील कॅनबेरा येथील केंद्रातून केले जात आहे.गोल्डन ग्लोब रेस ही आंतरराष्ट्रीय ख्यातीची आणि अत्यंत कठीण नौकानयन स्पर्धा आहे. यंदाच्या स्पर्धेला १ जुलै रोजी फ्रान्समधील ला सेब्ला दोलॉन येथून सुरुवात झाली. जगातील १८ खलाशी त्यात भाग घेत असून, ते साधारण ३०,००० सागरी मैलांचा प्रवास करून फ्रान्समधील मूळ ठिकाणी परततील. स्पर्धकांनी कोणत्याही बाह्यमदतीविना एकट्याने पृथ्वीप्रदक्षिणा करायची असते. कमांडर टॉमी यांनी यापूर्वी २०१३ साली समुद्रमार्गे पृथ्वीप्रदक्षिणा केली आहे.या स्पर्धेत आतापर्यंत ८४ दिवसांत १०,५०० सागरी मैलांचा खडतर प्रवास करून कमांडर टॉमी हे तिसऱ्या स्थानावर होते. हिंदी महासागराच्या दक्षिणेकडील प्रदेशात आॅस्ट्रेलियातील पर्थ येथून साधारण १९०० सागरी मैल अंतरावर असताना त्यांना वादळाने गाठले.ताशी १३० किमी वेगाने वाहणारे वारे आणि १० मीटर उंचीच्या लाटांच्या तडाख्याने टॉमी यांच्या थुरिया या नौकेची (यॉट) डोलकाठी (मास्ट) तुटली आणि टॉमी यांच्या पाठीला इजा झाली. (वृत्तसंस्था)
नौदलाचे बेपत्ता कमांडर अभिलाष टॉमी सापडले, सेनेच्या विमानाने घेतला शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 3:27 AM