नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या सांगली अन् कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीनंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र, अद्यापही संकटांचा डोंगर येथील पूरपीडित नागरिकांसमोर उभा आहे. पंचगंगा, कोयना आणि कृष्णा नदीच्या महापुरात हे दोन्ही जिल्हे पाण्याखाली गेले होते. तर, नाशिक, सातारा आणि कोकणातील काही भागांनाही पूराचा सामना सहन करावा लागला. या पूरस्थितीत स्थानिक पोलिसांसह एनडीआरएफ, आर्मी, नेव्ही, कोस्टल गार्ड आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन हजारो जीव वाचवले असून लाखोंना सुरक्षितस्थळी पोहोचवले आहे.
राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्नांची पराकष्टाचे केल्याचं दिसून आलं. आतापर्यंत राज्यातील 5 लाख 60 हजार 953 पुरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश आलं आहे. शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, वायूदल, तटरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत, अशी माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली. तर, केवळ भारतीय वायू दलाने 14,000 नागरिकांना एअरलिफ्ट करत त्यांचा जीव वाचवला आहे.
महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक राज्यातही गेल्या 7 दिवसांपासून पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. या पूरस्थितीतून भारतीय नौदलाने तब्बल 14000 नागरिकांना एअरलिफ्ट करुन आणि बोटींच्या त्यांचा जीव वाचवला. वर्षा राहत या ऑपरेशन अंतर्गत वायू दलाची 41 पथके विविध राज्यातील पूरग्रस्त भागात कार्यरत होती. हेलिकॉप्टर आणि बोटीच्या सहाय्याने ही पथके आपलं कर्तव्य बजावत होती. गेल्या 30 वर्षातील हे सर्वात मोठे ऐतिहासिका बचाव कार्य असल्याचे वायू दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. नौदलाच्या पथकांकडून महाराष्ट्र आणि गोव्यातून तब्बल 11,124 लोकांना वाचविण्यात आले आहे. नौदलाच्या हेलिकॉप्टरने 1890 किलो वजनाचे बचाव आणि मदत साहित्य महाराष्ट्रात पुरवले असून कर्नाटकमध्ये 1305 किलो सामान देण्यात आलं आहे.
दरम्यान, स्थानिक प्रशासनाबरोबरच सांगली, कोल्हापूर येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे 22, राज्य आपत्ती व्यवस्थापन दल 3, तसेच नौदलाच्या 18, तटरक्षक दलाचे 8, आर्मी 17, उपलब्ध बोटी 163 अशी पथके कार्यरत आहेत. आतापर्यंत कोल्हापूर येथील 3 लाख 36 हजार 297 तर सांगली येथील 1 लाख 74 हजार 485 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.