मुंबई - राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केली आहे. पहाटे 5 वाजताच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात आणले होते. त्यांतरच्या 8 तासांच्या चौकशीनंतर अखेर मलिक यांना ईडीनं अटक केली असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर दिवसभरातून राष्ट्रवादी पक्षाने घेतलेल्या भूमिका मलिक यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात येत आहेत.
नवाब मलिकांच्या अटकेमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह दिग्गजांनी प्रतिक्रिया दिल्या असून ट्विटरवरुन या सर्वच प्रतिक्रिया शेअर करण्यात आल्या आहेत. मलिक यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन आणि त्यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबतची माहिती शेअर करण्यात येत आहे. नवाब मलिक यांच्या कार्यालयीन ट्विटर हँडलवरुन सर्वप्रथम सकाळी 10.23 वाजता मलिक यांच्या घरावर ईडीची धाड पडल्याची माहिती देण्यात आली.