महाराष्ट्र सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना EDकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. मलिकांवर आता राजीनाम्याची टांगती तलवार असताना बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.
ममतांचा पवारांना सल्ला
नवाब मलिक यांच्या अटकेवर ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यात फोनवर सुमारे दहा मिनिटे संभाषण झाले.सूत्रांनी सांगितले की, ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय एजन्सींच्या गैरवापराच्या विरोधात विरोधकांच्या एकत्रीकरणाबद्दल बोलल्या असल्याची माहिती आहे. या संवादादरम्यान नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून हटवू नका, असा सल्ला ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांना दिला आहे.
राजीनामा घेणार नाहीत?
गेल्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. त्याआधी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्यांवर आरोप झाले. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या पाठिशी ठामपणे उभ्या राहिल्या. त्यांनी मंत्र्यांचे राजीनामे घेतले नाहीत. त्याचप्रमाणे मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याची माहिती मिळत आहे.
पवारांच्या निवासस्थानी बैठक
नवाब मलिक यांच्या अटकेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. अटकेचे वृत्त कळताच काही तासांतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीशिवाय काँग्रेसचे नेतेही पोहोचले. या बैठकीला अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, अजित पवार उपस्थित होते.