नवी दिल्ली – मनी लॉन्ड्रिंग आणि दाऊद इब्राहिमच्या निकटवर्तीयांकडून संपत्ती खरेदी करण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांना सुप्रीम कोर्टाचा दणका मिळाला आहे. मलिक यांनी अंतरिम जामीनासाठी कोर्टात अर्ज केला होता. परंतु कोर्टानं सध्या तपास सुरू असल्याने हस्तक्षेप करणं योग्य नाही असं सांगत अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे मलिकांना आणखी काही काळ कोठडीतच राहावं लागेल.
शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने(Supreme Court) मलिकांच्या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाने नवाब मलिकांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. परंतु याठिकाणीही मलिक यांना दिलासा मिळाला नाही. नवाब मलिक यांच्यावर ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यापासून नवाब मलिक ईडीच्या कोठडीत आहेत. जामीन अर्जावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, तपासाच्या या टप्प्यावर आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही.
काय आहे प्रकरण?
नवाब मलिक यांच्यावर ईडीने अंडरवर्ल्डशी संबंध आणि टेरर फंडिंग केल्याचा गंभीर आरोप केला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याकडून एक जमीन अवैध मार्गाने एका पैशाच्या मोबदल्यात खरेदी केली. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्या तपासात हसिना पारकरचा मुंबईतील कुर्ला परिसरातील गोवा वाला कंपाऊंडमधील सुमारे ३ एकर जमिनीवर डोळा असल्याचे आढळून आले. या जमिनीची मालकी मुनिरा प्लंबर नावाच्या महिलेकडे असली तरी तिने या जमिनीवर स्थायिक झालेल्या भाडेकरूंकडून पैसे वसूल केले आणि इतर कामांसाठी या जमिनीचा पॉवर ऑफ अॅटर्नी दाऊद इब्राहिमचा खास गुंड होता आणि १९९३ मध्ये मुंबईतील स्फोटातील दोषी सरदार वली शाह खान याला देण्यात आले होते. मात्र, हसीना पारकर, सरदार वली शाह खान आणि सलीम पटेल नावाच्या आणखी एका व्यक्तीने या जमिनीसाठी खोटे मुखत्यारपत्र तर मिळवलेच, शिवाय ही जमीन राष्ट्रवादीचे नेते नवाब यांना विकली.
नवाब मलिक सध्या आर्थर रोड तुरुंगात
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्यांतर्गत अलीकडेच नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने २३ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आर्थर रोड कारागृहात आहेत.