मुंबई: उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे योगी सरकार सत्तेत आल्यापासून काही ठिकाणांची नावे बदलण्यात आली. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी अलाहाबाद या शहराचे नाव बदलून प्रयागराज केले होते. सर्व सरकारी दस्तऐवजांमध्ये देखील तसे बदल करण्यात येत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
नवाब मलिक यांनी अकबर इलाहाबादी यांचा एक शेर ट्वीट करत नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कौम के गम में डिनर खाते हैं हुक्काम के साथ, रंज लीडर को बहुत है मगर, आराम के साथ..अकबर इलाहाबादी... अकबर इलाहाबादी नहीं, अब प्रयागराजी कहिए… हद कर दी... कहां कहां बदलोगे, अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली आहे.
शहराच्या नावासोबतच व्यक्तींची नावेही बदलतील का?
उत्तर प्रदेश उच्च शिक्षण सेवा आयोगाच्या वेबसाईटवर चक्क काही प्रसिद्ध कवींची आडनावे बदलण्यात आली आहे. त्यांचे आडनाव ‘इलाहाबादी’ ऐवजी ‘प्रयागराज’ असे लिहिण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होता आहे. वेबसाईटवरील अलाहाबाद विभागात प्रसिद्ध कवी अकबर इलाहाबादी, तेग इलाहाबादी आणि राशीद इलाहाबादी यांची आडनावे बदलण्यात आली असून अकबर प्रयागराज, तेग प्रयागराज आणि राशीद प्रयागराज असा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकारानंतर शहराच्या नावासोबतच व्यक्तींची नावेही बदलतील का, अशी चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, फर्जीबाबा कालिचरण यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना शिवागाळ केली असून, अशा वक्तव्यांना देश कधीही सहन करणार नाही. तसेच गोडसेचा महिमामंडळ होत असताना आता मोदी सरकार आल्यावर देशात महात्मा गांधीजींना शिवागाळ करण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी यापूर्वी केला होता.