नवी दिल्ली – मुंबई क्रुझ ड्रग्ज(Mumbai Cruise Drugs Party) प्रकरणात मंत्री नवाब मलिक सातत्याने NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. यात क्रुझवरील पार्टीत असणारा दाढीवाला कोण? त्याला वानखेडे यांनी सोडून दिले असा आरोप केला. हा दाढीवाला म्हणजे काशिफ खान याबाबत मलिकांनी एक व्हिडीओ शेअर करत त्याच्यावर सेक्स रॅकेट आणि ड्रग्ज माफिया असल्याचा आरोप केला होता.
काशिफ खान (Kashif khan) हा फॅशन टीव्ही इंडियाचा मालक आहे. आजतकशी बोलताना काशिफ खाननं मलिकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. काशिफ खान म्हणाला की, नवाब मलिक यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. माझं कुठल्याही सेक्स रॅकेट अथवा ड्रग्जच्या उद्योगाशी संबंध नाही. फॅशन टीव्ही आयोजिक एका कार्यक्रमासाठी आम्ही क्रुझवर आयोजक म्हणून होतो. स्वत: तिकीट घेऊन त्या क्रुझवर गेलो होतो. क्रेडिट कार्डमधून खाण्यापिण्याचे बिल भागवलं त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत असंही काशिफ खान म्हणाला.
तसेच मंत्री नवाब मलिक यांनी केलेले आरोप ऐकून मला धक्का बसला आणि आश्चर्य वाटलं. ते मंत्री आहेत. ताकदवान माणूस आहे. मी त्यांचा आदर करतो. ते जे आरोप करतायेत त्याने हैराण आहे. आधी सर्व तथ्य ओळखा मग बोला. माझा सेक्स रॅकेट आणि ड्रग्जशी काहीही संबंध नाही. आर्यन खानला मी क्रुझवर पाहिलंही नाही. मला ड्रग्जबद्दल काही माहिती नाही. मी फक्त आयोजक म्हणून तिथे उपस्थित होतो असं स्पष्टीकरण काशिफ खानने दिले आहे.
मी कुठल्याही चौकशीला तयार
समीर वानखेडे यांना मी कधी भेटलो नाही. माझा त्यांच्याशी संवाद नाही. कुठल्याही प्रकारच्या चौकशीला मी सामोरं जाण्यास तयार आहे. या प्रकरणाशी निगडीत तपास यंत्रणांना मी सहकार्य करेन. क्रुझ पार्टीचे आयोजक दिल्लीतील कंपनी आहे. या टीमला आमची माणसं भेटली होती. ते कोण आहेत याची माहिती नाही असं काशिफ खान यांनी सांगत नवाब मलिकांनी लावलेले सगळे आरोप फेटाळून लावलेत.
काय म्हणाले नवाब मलिक?
क्रूझवर एक दाढीवाला आंतरराष्ट्रीय ड्रग स्मगलर आपल्या प्रेयसीसोबत नाचत होता, तो एनसीबीचे समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा मित्र असल्याचा दावा मलिकांनी केला होता. मलिक यांनी फॅशन टीव्ही इंडियाचा एमडी काशिफ खान (Kashif khan) याचे नाव घेतले. या काशिफ खानवर देशभरात अनेक गुन्हे दाखल आहेत, दाढीवाल्या व्यक्तीला मलिक यांनी एक आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया म्हटले होते. त्याच्याशी संबंध असल्याने क्रूझवर तो असूनही समीर वानखेडे यांनी त्याला अटक केली नाही तसेच त्याची चौकशीही केली गेली नाही. या क्रूझवरील पार्टीबाबत कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती. एनसीबी काशिफ खानवर कारवाई का करत नाहीय, असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला होता.