ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - भारतातील प्रसिद्ध स्टील उद्योजक नवीन जिंदाल यांचा भाऊ सज्जन जिंदाल यांनी बुधवारी अचानक पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची गुप्त भेट घेतल्याने उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. पाकिस्तानी व्हिसा नियमांचे उल्लंघन करुन ही भेट झाल्याचा आरोप पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे.
या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मागच्या दरवाजाने द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. डिसेंबर 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तान दौ-यावरुन परतताना अचानक पाकिस्तानात उतरुन नवाझ शरीफ यांची भेट घेतली होती. ही भेट घडवण्यामागे सज्जन जिंदाल यांनी महत्वाची भूमिका बजावल्याची चर्चा त्यावेळी झाली होती.
पण सरकारने सज्जन जिंदाल यांची भूमिका नाकारली होती. जून महिन्यात कझाकस्तान अस्ताना येथे शांघाय कोऑपरेशन परिषद होणार आहे. यावेळी दोन्ही देशांमध्ये पुन्हा चर्चेला सुरुवात व्हावी हा या भेटीमागे उद्देश असल्याचे वृत्त द एक्सप्रेस ट्रिब्युनने दिले आहे.