ऑनलाइन लोकमत
लुधियाना, दि. 11 - दसरा सणानिमित्त दरवर्षी होणा-या 10 तोंडाच्या रावणाचे यंदा दहन होताना दिसणार नाही. कारण लुधियानामधील मिलेरगंजी येथील आझाद दसरा कमिटीने यावर्षी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची प्रतिमा रावण आणि 26/11चा मास्टरमाईंड हाफिज सईदचे मेघनाथ म्हणून दहन करण्याचे ठरवले आहे. उरी येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 20 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत.
ज्याप्रमाणे वाईटावर चांगल्याचा विजय, म्हणून दसरा सण साजरा केला जातो. याचा दाखला देत, पाकिस्तानने देखील सीमारेषेवर अनेक वाईट कृती केल्या आहेत. सर्व नापाक कारवायांचा निषेध म्हणून नवाज शरीफ आणि हाफिज सईदची प्रतिमा जाळण्यात येणार असल्याचे आझाद दसरा कमिटीने सांगितले.दोन्ही देशामधील संबंध चांगले राहावेत, यासाठी भारत नेहमी प्रयत्न करत आला आहे, मात्र पाकिस्तानने भारताच्या नेहमीच पाठीत सुरा खुपसण्याचे काम केले आहे.
भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक करुन उरी हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर दिले आहे. हाफिज सईदसारखा दहशतवादी भारतात अशांतता पसरण्याचे काम करत आहे, त्यामुळे त्याच्या देखील पुतळा जाळणार असल्याचे कमिटीचे अध्यक्ष परमिंदर सिंह यांनी सांगितले. या दोघांचेही प्रतिकात्म पुतळ्यांचे दहन करुन, आम्ही उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत, असे कमिटीने म्हटले आहे.