मुंबई- फेसबुकवर हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करून भावना भडकाविल्याप्रकरणी अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीचा भाऊ अयाझुद्दीन सिद्दीकीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'हिंदू युवा वाहिनी'च्या सदस्यांनी अयाझुद्दीन विरोधात तक्रार दाखल केली होती. अयाझुद्दीनने हिंदू देवताचा फोटो पोस्ट करत त्यावर आक्षेपार्ह कॅप्शन दिल्याचा आरोप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, अयाझुद्दीनने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 'सोशल मीडियावरील एका व्यक्तीला अशी टिपण्णी करण्यापासून मी रोखलं आहे, असं उत्तर अयाझुद्दीनने दिलं आहे. 'एका व्यक्तीने सोशल मीडियावर भगवान शंकराचा फोटो पोस्ट करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्या व्यक्तीने असं करू नये असं बजावत मी त्याला रोखलं. धार्मिक भावना यामुळे दुखावल्या जातील म्हणून त्या व्यक्तीला मी असं करण्यापासून रोखलं. पण उलट माझ्यावरच गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा तपास व्हायला हवा, अशी प्रतिक्रिया अयाझुद्दीनने दिली आहे.
दरम्यान, मुज्जफरनगरचे सहपोलीस निरिक्षक हरिराम यादव यांच्या माहितीनुसार, धार्मिक भावना दुखावण्याचा अयाझुद्दीनचा हेतू नव्हता. फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेल्या आक्षेपार्ह फोटोबद्दल त्याने आक्षेप नोंदवला. पण त्याचं मत मांडताना त्याने हिंदू युवा वाहिनीने आक्षेप घेतलेला फोटो घेतला, असं ते म्हणाले.