Naxal Attacks in Chhattisgarh: छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे आज(दि.26) नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला. दंतेवाडाच्या अरणपूरमध्ये जिल्हा रिजर्व्ह गार्ड (DRG) जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर आयईडी हल्ला करण्यात आला. या स्फोटात 11 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी नक्षलवाद्यांविरुद्धचा लढा शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरू राहील, असे म्हटले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनीही राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
छत्तीसगडचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनी सांगितले की, नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर डीआरजी जवानांना घटनास्थळी पाठवण्यात आले. शोध मोहिमेनंतर ते परतत असताना आयईडीचा स्फोट झाला. यामध्ये 10 डीआरजी जवान आणि एका ड्रायव्हरला आपला जीव गमवावा लागला. हल्ल्यानंतर घटनास्थळी अधिक फौजफाटा पाठवण्यात आला आहे.
याआधीही छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ले झाले
- एप्रिल 2021 मध्ये विजापूर आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये झालेल्या चकमकीत 22 जवानांना प्राण गमवावे लागले होते.
- मार्च 2018 मध्ये सुकमा जिल्ह्यात IED स्फोटात 9 CRPF जवान शहीद झाले होते.
- एप्रिल 2017 मध्ये सुकमा येथे माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत 24 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. याच्या महिनाभरापूर्वी सुकमामध्येच आणखी 12 सीआरपीएफ जवानांना प्राण गमवावे लागले होते.
- त्याआधी मार्च 2014 मध्ये सुकमामध्येच 15 सुरक्षा जवान शहीद झाले होते.
- मे 2013 मध्ये काँग्रेस नेत्यांवर मोठा हल्ला झाला होता. यामध्ये 25 नेते मारले गेले, त्यात मंत्री महेंद्र कर्मा यांचाही समावेश आहे. बस्तरच्या दरभा खोऱ्यात हा हल्ला झाला होता.
- जून 2010 मध्ये नक्षलवाद्यांनी नारायणपूरवर हल्ला केला, ज्यात 26 CRPF जवान शहीद झाले.
- एप्रिल 2010 मध्येच दंतेवाडा येथे 75 जवान शहीद झाले होते.
सुरक्षा कर्मचार्यांव्यतिरिक्त लोकांनाही लक्ष्य करण्याची संधी नक्षलवाद्यांनी सोडली नाही. फेब्रुवारी 2006 मध्ये छत्तीसगडमधील एराबोरू गावात नक्षलवाद्यांनी त्यांना विरोध करणाऱ्या आंदोलकांवर भूसुरुंगांचा वापर करून हल्ला केला. यामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला होता. जुलै 2006 मध्ये दंतेवाडा येथील मदत शिबिरावर हल्ला झाला होता. अनेक गावकऱ्यांचे अपहरण केले. यामध्ये 29 जणांचा मृत्यू झाला.