सरायकेला : बाजारात खरेदीसाठी आलेल्या पोलीस जवानांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पाच पोलीस शहीद झाले आहेत. नक्षलवादी पोलिसांकडे असलेली शस्त्रेही घेऊन पसार झाले आहेत. तर एक जवान बेपत्ता झाला आहे.
नक्षलवादी सहा मोटारसायकलवरून आले होते. तर पोलीस कुकडू गावातील आठवडा बाजारामध्ये काही खरेदीसाठी आले होते. त्यांनी खरेदी केली आणि बाजारातीलच एका मंदिराजवळ थांबले होते. याचवेळी सहा बाईकवरून बंदुकांसह आलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर जोरदार गोळीबार केला. यामध्ये पाच पोलीस शहीद झाले. यानंतर नक्षलवादी तिरुलडीह पोलीस ठाण्याच्या दिशेने पळून गेले.
हल्ल्यामध्ये शहीद झालेल्यांमध्ये तीन पोलिस कॉन्स्टेबल युधिष्ठिर मालुवा, धनेश्वर महतो आणि डिबरू पूर्ति तर दोन एएसआय मनोधन हासदां आणि गोवर्धन पासवान यांचा समावेश आहे. त्यांच्या वाहनाचा चालक असलेले सुखलाल कुदादा यांनी तेथून पळून जात प्राण वाचविले.
गेल्या आठवड्यात झारखंडमध्ये डुमका येथे रविवारी (2 जून) सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. तर यामध्ये एक जवान शहीद झाला. तर चार जवान जखमी झाले होते.