रायपूर - छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या धुमश्चक्रीत २२ जवान शहीद झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. या चकमकीनंतर बेपत्ता झालेल्या एका जवानाच्या मुलीने आपल्या वडिलांना बाबा, तुम्ही लवकर घरी या... अशी आर्त साद घातली आहे. बेपत्ता जवानांचे कुटुंब काळजीत आहेत. बेपत्ता जवान राकेश्वर सिंह मनहास यांच्या पत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना आपला नवरा घरी सुखरुप परतावा म्हणून विनंती केली आहे. त्यातच, नक्षलावाद्यांकडून या जवानाचा फोटो जारी करण्यात आला आहे.
सीआरपीएफने काही अधिकाऱ्यांना राकेश्वर सिंह मनहास यांच्या घरी पाठवले आणि आश्वासन दिले आहे की, बेपत्ता जवान नक्षलवाद्यांच्या ताब्यात आहे हे त्यांना ठाऊक आहे. त्यांची लवकरच सुटका केली जाईल. नक्षलवाद्यांनी एका पत्रकाराकडे कोब्रा कमांडो जवान सुरक्षित असल्याचा संदेश पाठवला होता. त्यानंतर, आज नक्षलवाद्यांनी राजेश्वर सिंह यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत, ते एका नारळाच्या झाडाच्या पानांनी बांधलेल्या झोपडीत बसलेल्याचे दिसून येते. सीआरपीएफकडून जवानाच्या फोटोची खात्री करण्यात आली असून राजेश्वर सिंह यांची प्रकृती उत्तम असल्याचे फोटोत दिसून येत आहे. नक्षल्यांनी काही तासांपूर्वीच हा फोटो शेअर केला आहे.
नक्षलवाद्यांच्या ताब्यात असतानाही भारतीय सैन्यातील कमांडो राकेश्वर सिंह यांचा निडरपणा एका फोटोतून स्पष्ट दिसत आहे. नक्षली लपून-छपून, कट कारस्थान रचून हल्ला करतात. मात्र, भारतीय सैन्याचे जवान निडर होऊन त्यांचा सामना करतात. राक्षसांसोबत राहून कमांडो राकेश्वर यांच्या चेहऱ्यावर ना भीती, ना डोळ्यात डर... असे म्हणत राकेश्वर सिंह यांचा फोटो दूरदर्शन हिंदी न्यूजचे अशोक श्रीवास्तव यांनी शेअर केला आहे.
अमित शहांनी केली पाहणी
सुकमा आणि बीजापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात ज्या ठिकाणी जवानांवर हा हल्ला झाला त्या ठिकाणीची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाहणी केली. तसेच शहीद जवानांना देशाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलताना, जवानांचं सर्वोच्च बलिदान वाया जाऊ देणार नाही. ताकदीने लढू आणि जिंकून दाखवू. छत्तीसगडच्या जनतेला आणि देशवासीयांना आश्वस्त करतो की, नक्षलवादाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यात येईल. गेल्या काही वर्षांपासून नक्षलवादाविरोधातील लढाई ही निर्णायक वळणावर पोहोचली असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.
काँग्रेसची मोदी-शहांवर टीका
नक्षल्यांनी ओलीस ठेवलेल्या कोब्रा कमांडो राकेश्र्वर सिंग मिनहास यांच्या सुटकेसाठी मोदी सरकार काहीच ठोस पावलं उचलताना दिसत नाहीये. सत्तेच्या लालसेपायी देशाचा कारभार वाऱ्यावर सोडून निवडणुकीच्या प्रचारात फिरणाऱ्या निवडणूकजिवी मोदी-शहांना जवानांच्या जिवाची जरा तरी किंमत आहे का?, असा प्रश्न काँग्रेसने ट्विट करुन विचारलाय. तसेच, मोदी आणि शहा हे निवडणुकांच्या प्रचार दौऱ्यातच व्यस्त असल्याचाही आरोप काँग्रेसने केलाय.