नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पुढच्या 3-4 वर्षांत देशातील नक्षलवाद्यांचा बीमोड करू असं म्हटलं आहे. झारखंडमधील चतरामध्ये मंगळवारी (23 एप्रिल) एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राजनाथ सिंह यांनी नक्षलवादावर भाष्य केले आहे.
'देशाच्या 126 जिल्ह्यांमध्ये पसरलेला नक्षलवाद आता केवळ फक्त 7-8 जिल्ह्यांपर्यंतच मर्यादित राहीला आहे. पुढच्या 3-4 वर्षांत भारतातून नक्षलवाद्यांचा बीमोड करू असे आश्वासन मी तुम्हाला देतो' असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. तसेच सुरक्षा हा देशाच्या विकासामधील आवश्यक भाग आहे आणि त्याच्या मार्गात येणारे दहशतवादी यांना चिरडून टाकण्यात येईल, असं राजनाथ यांनी एका सभेत सांगितलं आहे.
झारखंडमधील नक्षलवाद्यांचा नायनाट करण्यात आला आहे, राज्यात काही ठिकाणी असलेले त्यांचे अस्तित्व लवकरच संपुष्टात आणले जाईल. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसने सत्तेसाठी हातमिळवणी केली आहे, मात्र त्यांचे उद्दिष्ट सफल होणार नाही असेही गृहमंत्री म्हणाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी 'मृतदेह मोजायचे काम गिधाडांचे असते शूरवीरांचे नाही' असे म्हटले होते. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले याची माहिती केंद्राने द्यावी अशी मागणी केली होती. तसेच यावरून राजकारण करू पाहणाऱ्यांना मृतदेह मोजायचे काम गिधाडांचे असते शूरवीरांचे नाही असा टोला राजनाथ सिंह यांनी लगावला होता.
उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये सोमवारी (1 एप्रिल) एका प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राजनाथ सिंह या रॅलीमध्ये सहभागी झाले असून यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. 1971 ला स्व. इंदिरा गांधी यांचे सरकार असताना भारताने पाकिस्तानला धूळ चारली होती, तेव्हा अटल बिहारी वायपेयी यांनी संसदेमध्ये उभे राहून त्यांची प्रशंसा केली होती. त्यावेळी पाकिस्तानला धूळ चारल्यामुळे इंदिरा गांधींचा जयजयकार होत असेल तर आता पाकिस्तानमध्ये घुसून धडा शिकवणाऱ्या पंतप्रधान मोदींची प्रशंसा का होत नाही? मोदींची प्रशंसा करण्याऐवजी काँग्रेसला एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी ठार झाले हे जाणून घेण्यात रस आहे. परंतु शूरवीर मृतदेह मोजत बसतात का? मृतदेह मोजण्याचे काम वीरांचे नाही तर गिधाडांचे असल्याचा टोला राजनाथ सिंह यांनी लगावला होता.