Amit Shah on Naxalite : केंद्र सरकार नक्षलवाद्यांविरोधात सातत्याने कठोर कारवाई करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 31 मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद संपवण्याचा प्रण घेतला आहे. अशातच, विजापूरमध्ये रविवारी(30 मार्च) 50 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करुन हिंसाचाराचा मार्ग सोडल्याची माहिती समोर येत आहे. स्वतः गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.
अमित शाहांनी या 50 नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाच्या निर्णयाचे स्वागत केले असून, या सर्वांचे पुनर्वसन करून त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेतले जाईल, असे सांगितले. त्यांनी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि 31 मार्च 2026 नंतर देशात नक्षलवाद इतिहासजमा होईल असे ठणकावून सांगितले.
नक्षलवाद इतिहासजमा होईल50 नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाची माहिती देताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, 'विजापूर (छत्तीसगड) येथे 50 नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केले, ही आनंदाची बाब आहे. त्यांनी हिंसा आणि शस्त्रे सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला, त्याचे मी स्वागत करतो. जो नक्षलवादी शस्त्र सोडून विकासाचा मार्ग पत्करेल, त्यांचे पुनर्वसन करून त्यांना मुख्य प्रवाहात जोडले जाईल, असे पंतप्रधान मोदींचे धोरण स्पष्ट आहे. इतर नक्षलवाद्यांना हिंसाचाराचा मार्ग सोडण्याचे आवाहन करत शाहा पुढे म्हणाले, मी पुन्हा एकदा उर्वरित नक्षलवाद्यांना शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन करतो. 31 मार्च 2026 नंतर देशात नक्षलवाद इतिहास राहील, हा आमचा संकल्प आहे, असेही शाहा म्हणाले.
सीआरपीएफसमोर आत्मसमर्पण पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील 50 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यापैकी 14 जणांवर एकूण 68 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्या सर्वांनी राज्य पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपले शस्त्र ठेवले. नक्षलवाद्यांना आंदोलन सोडून मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी सरकारच्या धोरणानुसार त्यांचे पुनर्वसन केले जाईल, असे एसपी म्हणाले.