Bijapur Naxalite Attack: छत्तीसगढच्या विजापूर येथे झालेल्या नक्षली हल्ल्यात उत्तर प्रदेशच्या चंदोली येथील वीर जवान धर्मदेव कुमार (Dharmadev Kumar) हे शहीद झाले. रविवारी रात्री उशिरा त्यांच्या कुटुंबियांना धर्मदेव शहीद झाल्याचं कळताच कुटुंबासह संपूर्ण शाहबगंजमध्ये शोककळा पसरली. धर्मदेवच्या घरी गावातील नागरिक जमा होऊ लागले. जिल्ह्यातील अनेक अधिकारी देखील धर्मदेव यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. (Naxalite Attack In Bijapur Of Chhattisgarh Dharmadev Martyr Of Chandauli)
धर्मदेव सीआरपीएफच्या स्पेशल ग्रूपच्या कोब्रा बटालियनमध्ये कमांडो पदावर कार्यरत होते. २०१३ साली त्यांची सीआरपीएफमध्ये निवड झाली होती. धर्मदेव यांना लहानपणापासून देशाच्या सेवेसाठी लष्करातच भरती व्हायचं होतं, असं धर्मदेव यांचे वडील रामाश्रय गुप्ता यांनी सांगितलं.
मार्चमध्ये सुट्ट्यांसाठी आले होते घरीधर्मदेव हे मार्च महिन्यात सुटीसाठी घरी परतले होते. होळीच्या १० दिवस आधी सुटी संपवून ते पुन्हा सेवेत रुजू होण्यासाठी निघाले होते. पुन्हा ड्युटीवर जाण्यासाठी निघताना मी लवकरच परत येईन, असं वचन धर्मदेव यांनी आपल्या कुटुंबियांना दिलं होतं. पण काल त्यांच्या निधनाची बातमी घरी धडकली आणि संपूर्ण गाव सुन्न झालं आहे.
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद; 10 जखमी
धर्मदेव शहीद झाल्याचं कळाल्यापासून त्यांच्या मातोश्री कृष्णावती आणि पत्नी मीना यांना जबर धक्का बसला आहे. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबण्याचं नाव घेत नाहीयत. धर्मदेव यांच्या जाण्यानं त्यांच्या दोन मुली साक्षी आणि ज्योती यांच्या डोक्यावरचं छत्र हरवलंय. धर्मदेव यांच्या पत्नी मीना गर्भवती देखील आहेत. अशा परिस्थितीत धर्मदेव यांच्या जाण्यानं संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
लहान भाऊ देखील लष्करी सेवेतधर्मदेव यांचा लहान भाऊ धनंजय देखील सीआरपीएफमध्ये आहे. धर्मदेव यांच्यासोबतच धनंजयचीही लष्करात निवड झाली होती. धनंजय सध्या छत्तीसगढमध्ये तैनात आहेत.