ठाणे : जहाल नक्षलवादी तथा एमएमसी प्रमुख आणि माओवादी संघटनेच्या सेंट्रल झोन कमिटीचा सदस्य जिवा उर्फ दीपक उर्फ मिलिंद तेलतुंबडे (रा. राजूर, यवतमाळ) याचा तसेच त्याची अंगरक्षक विमला उर्फ ईमला उर्फ कमला उर्फ मान्सो सुखराम बोगा (रा. गजामेंढी, गडचिरोली) यांच्यासह २६ नक्षलवाद्यांचा शनिवारी गडचिरोली पोलिसांनी खात्मा केला. त्यांच्यापैकी १४ नक्षलींवर एक कोटी ३८ लाखांचे बक्षीस राज्य शासनाने यापूर्वीच जाहीर केले होते. मिलिंदचा सहा राज्यांमधील नक्षली कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असल्याची माहिती गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात दिली.
गडचिरोली पोलिसांनी जिवाची बाजी लावून गस्तीदरम्यान पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या नक्षलींवर हल्ला केला. यात मिलिंदसह २० पुरुष आणि सहा महिला नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. या जहाल नक्षलींचा छत्तीसगढ आणि आंध्र प्रदेशचे पोलीसही शोध घेत होते. २६ पैकी १६ नक्षलींची ओळख पटली असून, दहा अनोळखींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. यामध्ये सेंट्रल कमिटी मेंबर (सीसीएम) जिवी उर्फ मिलिंद तेलतुंबडे याच्यावर ५० लाखांपेक्षा अधिक तर त्याची अंगरक्षक विमला हिच्यावर चार लाखांचे बक्षीस होते. उर्वरित बंडू उर्फ दलसू गोटा, प्रमोद उर्फ दलपत कचलामी आणि कोसा उर्फ मुसाखी या कंपनी चारमधील पीपीसीएम पदावरील नक्षलींवर चार लाखांचे, तर मिलिंदचा अन्य एक अंगरक्षक एसीएम भगतसिंग उर्फ प्रदीप जाडे याच्यावर सहा लाखांचे बक्षीस होते. याशिवाय, छत्तीसगढच्या टिपागढ दलममध्ये अलीकडेच भरती झालेला चेतन याच्यावर दोन लाख रुपये, छत्तीसगढच्याच कोरची दलमचा कमांडर किशन उर्फ जैमन आणि कसनसूर दलमचा कमांडर सत्रू उर्फ कोवाची या दोघांवर प्रत्येकी आठ लाखांचे बक्षीस होते. गडचिरोलीच्या कसनसूर दलमचा डीव्हीसीएम महेश उर्फ शिवाजी गोटा याच्यावर १६ लाख, तर प्रकाश उर्फ साधू सोनू बोगा, लच्छू (छत्तीसगढ) आणि नवलूराम उर्फ दिलीप तुलावी या कंपनी क्रमांक चारच्या पीएम यांच्यावरही प्रत्येकी चार लाखांचे बक्षीस होते. याशिवाय, लोकेश उर्फ मंगू पोडयाम (रा. दंतेवाडा, छत्तीसगढ) या कंपनी चारच्या कमांडरवरही राज्य शासनाने २० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.