गया - बिहारमधील गया मुख्यालयापासून ७० किमी अंतरावर असलेल्या डुमरिया ब्लॉकच्या मौनवर गावात माओवाद्यांनी दोन महिलांसह चार जणांची हत्या केल्याची घटना घडली आहे. नक्षलवाद्यांनी या चौघांनाही घराबाहेर फाशी दिली. हे चौघेही एकाच कुटुंबातील आहेत. एवढेच नाही, तर माओवाद्यांनी येथे एका घरालाही आग लावली आणि दुचाकीही जाळली.
मारल्या गेलेल्यांमध्येय सतेंद्र सिंह, महेंद्र सिंह, मनोरमा देवी आणि सुनीता सिंह यांचा समावेश आहे. यानंतर माओवाद्यांनी येथे एक पत्रक लावले. यावर लिहिले आहे की, मानवतेची हत्या करणारे आणि विश्वासघात करणाऱ्यांना मृत्यू दंडाशिवाय पर्याय नाही. हा अमरेश, सीता, शिवपूजन आणि उदय या आमच्या चार सहकाऱ्यांच्या हत्येचा बदला आहे. भविष्यातही अशी कारवाई सुरूच राहणार आहे. त्यांना विष देण्यात आले होते.
घटनास्थळी लावण्यात आलेले हे पत्रक जनमुक्ती छापाकार सेना, मध्य विभाग झारखंड, सीपीआय (माओवादी) यांच्या नावाने लावण्यात आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. या विषयावर कोणी फारसे बोलायला तयार नाही. गया मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.
यासंदर्भात बोलताना एसएसपी आदित्य कुमार म्हणाले, निवडणुकीवर प्रभाव पाडण्यासाठी नक्षलवाद्यांचे हे भ्याड कृत्य आहे. ज्या ठिकाणी चकमकीत चार नक्षलवादी मारले गेले, त्याच ठिकाणी या हत्या करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.