गडचिरोली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च २०२६ अखेरपर्यंत देशातून नक्षलवाद हद्दपार करणार असल्याचा निर्धार केल्यानंतर महाराष्ट्र व छत्तीसगडमध्ये आक्रमक कारवाया सुरू आहेत. त्यामुळे माओवाद्यांनी नांगी टाकली असून, केंद्र सरकारपुढे युद्धविरामाचा प्रस्ताव सादर केला आहे. केंद्रीय समिती सदस्य अभय ऊर्फ सोनू भूपती याने यासंदर्भात तेलुगू भाषेत पत्रक जारी करून कारवाया रोखण्याचे आवाहन सरकारला केले आहे.
छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा, झारखंड राज्यांत नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान झाले आहे. गेल्या १५ महिन्यांत झालेल्या चकमकीत तब्बल ४०० हून अधिक नक्षलवादी ठार झाले. शेकडो कारागृहात आहेत, इतकेच नव्हे तर यात अनेक निरपराध आदिवासी मारले गेल्याचा दावाही पत्रकात केला आहे. ३० मार्चचे हे पत्रक असून, त्यावर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा नक्षल नेता अभय ऊर्फ सोनू उर्फ भूपती याचा उल्लेख आहे.