जगदलपूर : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्ह्यातील एका दुर्गम गावात शेकडोच्या संख्येतील नक्षलवाद्यांच्या टोळीने हल्ला करून प्राथमिक शाळेची इमारत उद्ध्वस्त केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सर्व शाळा इमारतींची पोलीस सुरक्षा हटविण्यात आल्यानंतर नक्षलवाद्यांनीही शाळांना लक्ष्य करणे बंद केले होते; परंतु सोमवारी भांसी मासापारा येथील शाळेवर त्यांनी हल्ला केला. शालेय विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे त्यांनी हे कृत्य केले असावे असा कयास आहे. यापूर्वी नक्षल्यांनी २०१० मध्ये सूरनारमध्ये बांधकाम सुरू असलेल्या शाळा इमारतीची तोडफोड केली होती.
पोलीस-नक्षलवादी चकमकछत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी पोलीस दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जीवितहानीचे वृत्त नाही. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांबद्दल गोपनीय सूचना मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस आणि विशेष कृती दलाचे (एसटीएफ) संयुक्त पथक मुनगा, सावनार, मनकेली आणि कोरमा गावाकडे रवाना झाले होते. (वृत्तसंस्था)